Last Updated: Thursday, February 23, 2012, 11:58
www.24taas.com, नवी दिल्ली टीम अण्णा आज मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरैशी यीं भेट घेणार आहेत. प्रस्तावित निवडणूक सुधारणा प्रक्रियेत नागरी समाज (सिव्हिल सोसायटी) यांचा समावेश करण्यासंबधींच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी टीम अण्णा मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेणार आहे. नागरी समाज शिष्टमंडळासमवेत अण्णा हजारेही या बेठकीत सहभागी होणार आहेत का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.अण्णा हजारे हे सध्या दिल्लीत आहेत.
टीम अण्णांनी निवडणूक प्रक्रियेत राईत टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट या दोन प्रमुख मागण्या कुरैशी यांनी फेटाळल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर टीम अण्णा ही भेट घेणार आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला माघारी बोलवण्याचा अधिकार तसंच नकाराधिकाराचा अधिकार या दोन प्रमुख मागण्या टीम अण्णांनी लावून धरल्या आहेत. जनतेची काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना माघारी बोलवण्याचा अधिकार भारतासारख्या मोठ्या देशात उपयोगी ठरणार नसल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचे मत आहे. कुरैशी यांनी यामुळे देश अस्थिर होईल असा इशारा दिला आहे.
काश्मिर आणि इशान्य भारतात जिथे जनता मुख्य प्रवाहापासून दूर आहे तिथे अशा स्वरुपाच्या प्रस्तावांचा गैरवापर होऊ शकतो आणि त्यामुळे चुकीचा संदेश जाईल अशी भीती निवडणूक आयोगाला वाटत आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये 49-0 बटनाचा समावेश करुन उमेदवारा बद्दल मतदारांना नापसंती व्यक्त करण्याच पर्याय उपलब्ध करुन देण्याचा उपाय कुरैशी यांनी सुचवला आहे. पण त्याचप्रमाणे हा पर्याय उपलब्ध करुन दिल्यास वारंवार निवडणुका घ्याव्या लागु शकतात असा इशाराही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे.
अण्णा हजारे यांनी कोट्यावधी रुपये निवडणुकीला खर्च करणाऱ्या उमेदवारांना नकाराधिकारामुळे वचक बसेल आणि त्यामुळे निवडणुकीतील पैशाच्या गैरवापराला आळा बसेल असं मत व्यक्त केलं हे. अण्णा हजारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईच्या संदर्भात केलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
First Published: Thursday, February 23, 2012, 11:58