पाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू - Marathi News 24taas.com

पाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
 
देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.
 
 
या निकालातून उत्तर प्रदेशातील बसपाच्या मुख्यमंत्री मायावती, उत्तराखंडमधील भाजपचे मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी, पंजाबमधील अकाली दलाचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, मणीपूरचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री ओक्रम इबोबी सिंग आणि गोव्यातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या भवितव्याचा फैसला होईल. ही निवडणूक मिनी लोकसभा निवडणूकच मानली जात असल्याने अवघ्या देशाचे लक्ष  या निकालाकडे लागले आहे.
 
पहिला निकाल सकाळी ९ वाजता अपेक्षित असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाचही राज्यांत ‘सत्ता’ कोणाची याचे चित्र स्पष्ट होईल. कॉंग्रेसने उत्तर प्रदेशची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राहुल गांधी वर्षभर उत्तर प्रदेशात तळ ठोकून होते. पण एक्झिट पोल आणि राजकीय निरीक्षकांच्या अंदाजानुसार राहुल यांचा करिष्मा चालणार नाही. त्यामुळे निकालाकडे लक्ष लागले आहे.
 
 
उत्तर प्रदेशात बसपाचा ‘हत्ती’ की ‘सपा’ची ‘सायकल’ धावणार की पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल की कॉंग्रेस बाजी मारणार याची उत्सुकता आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे खंडुरी कार्ड चालणार की कॉंग्रेस सत्तेत येणार याची चर्चा आहे. गोव्यात ८१ टक्के मतदानाचा कौल कोणाला मिळणार याचीच जास्त उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  मणीपूरमध्ये कॉंग्रेस आणि मित्र पक्षांची वाट बिकट असल्याची परिस्थिती आहे.
 
 
उत्तर प्रदेश - ४०३, पंजाब - ११७, उत्तराखंड - ७०, गोवा - ४०, मणीपूर - ६० जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत दिग्गज् उमेदवारांचे भवितव्य पणाला लागणार आहे. त्यामुळे देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
 

First Published: Tuesday, March 6, 2012, 08:19


comments powered by Disqus