Last Updated: Saturday, March 10, 2012, 23:59
www.24taas.com, पणजी भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रिकर यांच्याबरोबरच दयानंद मांदेकर, लक्ष्मीकांत पारसेकर, मतान्ही साल्दाना आणि फ्रान्सिस डिसोझा या भाजप आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या रामकृष्ण ढवळीकर यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली.
हा शपथविधी राजभवनाऐवजी मोकळ्या मैदानावर झाला. गोव्याच्या इतिहासात अशा प्रकारे पहिल्यांदाच शपथविधी घडला. गोव्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, रवीशंकर प्रसाद, एम. व्यंकय्या नायडू आणि राजीव प्रताप रुडी आदी नेते उपस्थित होते.
पर्रिकर यांनी यापूर्वी दोनवेळा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. पण आघाडीच्या सत्तेमुळे त्यांना आत्तापर्यंत एकदाही पाच वर्षांचा काळ पूर्ण करता आला नव्हता. यावेळी एकुण ४० सदस्य असणाऱ्या विधानसभेत भाजपचे २१ सदस्य आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आणि दोन अपक्ष उमेदवारांचाही पाठिंबा मिळाल्यावर ही संख्या २६ एवढी झाली आहे.
First Published: Saturday, March 10, 2012, 23:59