टू-जी सुनावणीत आजपासून कोर्ट ‘बिझी’ - Marathi News 24taas.com

टू-जी सुनावणीत आजपासून कोर्ट ‘बिझी’

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
तब्बल पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या टू-जी घोटाळा खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस परिसरातल्या सीबीआयच्या विशेष कोर्टात याची सुनावणी होणार आहे.
 
माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, कनिमोळी यांच्यासह 14 जणांवर तसंच रिलायन्स कम्युनिकेशन, युनिटेक वायरलेस आणि स्वान टेलिकॉम या तीन कंपन्यांविरूद्ध आरोपपत्र निश्चित करण्यात आलेत. आरोपींपैकी अद्याप कुणालाही जामीन मिळू शकलेला नाही. त्यामुळं ए. राजासह कनिमोळी, स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद बलवा, डी.बी. रिएलिटीजचे विनोद गोयंका अशा अनेक बड्या आसामींचा मुक्काम अद्याप तिहार जेलमध्येच आहे.
 
सीबीआयने कोर्टापुढे सादर केलेल्या साक्षीदारांच्या पहिल्या यादीत 28 जणांचा समावेश आहे. त्यापैकी रिलायन्सचे ग्रुप प्रेसिडेंट ए. एन. सेथुराम, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आनंद सुब्रमण्यम आणि इटिसलाट डीबी टेलिकॉमचे विनोदकुमार यांची साक्ष आज होण्याची शक्यता आहे. या तिघांसह रिलायन्सच्या 11 वरिष्ठ अधिका-यांचीही साक्ष आज होणार आहे.

First Published: Friday, November 11, 2011, 12:36


comments powered by Disqus