Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:35
www.24taas.com, नवी दिल्ली
संसदेत बुधवारी सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी आणि माल वाहतूकीच्या भाड्यात वाढ होणार नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तरी सेफ्टी सेस लागु करण्याची शक्यता आहे. तृणमुल काँग्रेसचे नेते आणि रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. पण आपल्या आधीच्या रेल्वे मंत्र्यांप्रमाणेच तेही सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ करणार नाही अशी अपेक्षा आहे. गेल्या दशकात ममता बॅनर्जींसह इतर रेल्वे मंत्र्यांनी प्रवासी भाड्यात वाढ केली नव्हती.
पण काकोडकर कमिटीच्या अहवालात सेफ्टी सेस लागु करण्याची शिफारस करण्यात आली आहे ती अंमलात आणली जाण्याची शक्यता आहे. महाकाय भारतीय रेल्वेच्या जाळ्याच्या सुरक्षेच्या मुद्दावर विचार करत काकोडकर कमिटीने सेस आकारण्याची सूचना केली आहे. सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणा सुधारण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी 5000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी सेस आकारण्यची सूचना कमिटीने केली आहे. इंधन दरातील वाढीसाठी मूळ भाडं इंधन दराशी संलग्न ठेवण्याची सूचनाही कमिटीने केली आहे. रेल्वेला दरवर्षी इंधनापोटी 19,000 कोटी रुपये खर्च येतो.
रेल्वेला आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून 50,000 कोटी रुपयांच्या आर्थिक पाठबळाची अपेक्षा असताना फक्त 25,000 कोटी रुपयेच मिळाले आहेत. रेल्वेने याआधीच 6 मार्च रोजी सर्व प्रकारच्या कमोडीटीच्या मालवाहतूकीच्या भाड्यात वाढ केली असल्याने आता परत वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
First Published: Tuesday, March 13, 2012, 16:35