Last Updated: Friday, March 16, 2012, 16:09
www.24taas.com, नवी दिल्ली अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते, भविष्यात महागाई कमी होईल. मात्र, या महागाईत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत देऊन भडका उडविण्याचा चंग बांधलेला दिसून आला. मुखर्जी यांनीही पेट्रोलचे दर वाढण्याची भाषा केली होती. त्यामुळे पुन्हा महागाई डोकेवर काढण्याची नांदी दिली गेली आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांना दिलासा न देणाऱ्या अर्थसंकल्पाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र त्याचे कौतुक केले आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या अर्थसंकल्पावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. असे असताना पंतप्रधानांनी केलेले कौतुक योग्य नाही, असे विरोधकांनी म्हटले आहे. तर सरकारने पेट्रोलवरील सबसिडी रद्द करण्याचेही संकेत दिले आहेत.
मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पामुळे देशाच्या विकास दरात वाढ होईल. तर संयुक्त पुरोगामी आघाडीतील सहकारी पक्षांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. या बजेटमुळे देशाला आर्थिक स्थिरता लाभेल, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
विरोधकांची कडाडून टीकाडाव्यानी अर्थसंकल्पावर टीका केली. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसांसमोरील अडचणीत कमालीची वाढ होईल आणि महागाईही मोठया प्रमाणात वाढेल, असे त्यांनी म्हटले. रेल्वे भाडेवाढ विरोधात तणतण करणा-या तृणमूल कॉंग्रेसने आजचे बजेट हे 'कामचलाऊ' असल्याचे म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी चांगली संधी गमावल्याचे उद्योग जगतातून बोलले जात आहे. उत्पादन शूल्कात वाढ केल्यामुळे महागाईत वाढ होईल, असे जेके ग्रुपचे हर्षिल सिंघानिया यांनी म्हटले.
सोचॅमचे अध्यक्ष वेणुगोपाल धुत यांनी देखील बजेटबाबत आपली निराशा व्यक्त केली. बजेटमुळे देशाला अपेक्षित विकासाचा दर गाठता येणार नसल्याचे फिक्कीने म्हटले आहे.
First Published: Friday, March 16, 2012, 16:09