Last Updated: Saturday, March 17, 2012, 18:54
www.24taas.com, नवी दिल्ली देशाच्या संसदेत खूनी, दरोडेखोर आणि बलात्कारी बसले आहेत, असे वक्तव्य करणारे टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
केजरीवाल यांना या नोटीसचे उत्तर देण्यासाठी आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. संसदेविरोधात अपशब्द वापरणारे अरविंद केजरीवाल यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील देवास येथील खासदार सज्जन सिंह वर्मा यांनी केजरीवाल यांना अपमान केल्याची नोटीस पाठविली आहे. दरम्यान, ही नोटीस मिळाल्याची माहिती टीम अण्णांमधील सदस्यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशात एका प्रचारसभेदरम्यान केजरीवाल यांनी संसदेत खूनी, दरोडेखोर आणि बलात्कारी बसले असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. राजकीय पक्षांनी विरोध करूनही केजरीवाल यांनी आपले वक्तव्य परत घेतले नव्हते. आता नोटीस मिळाल्याने केजरीवाल यांना खुलासा करावा लागणार आहे. हा खुलासा मान्य न झाल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.
First Published: Saturday, March 17, 2012, 18:54