सरकार-लिट्टे गुप्त बैठकीबाबत गौप्यस्फोट - Marathi News 24taas.com

सरकार-लिट्टे गुप्त बैठकीबाबत गौप्यस्फोट

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
नॉर्वेचे कॅबिनेट मंत्री एरिक सोल्हेम यांनी सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी २००२ साली लिट्टेशी गुप्त भेट घेतली होती असं ते म्हणाले. लिट्टे आणि श्रीलंका सरकार यांच्यात युध्दबंदी होण्याच्या अगोदर ही भेट झाली होती. भारत सरकारने तमिळ टायगर्सना दहशतवादी संघटना असल्याचं जाहीर केलं असतानाही त्यांच्याशी गुप्त बोलणी करण्यात आली होती.
तमिळ टायगर्स आणि श्रीलंकन सरकार यांच्या नऊ वर्षापूर्वी झालेल्या युध्दबंदी करारा संदर्भात भारताने पडद्याआडून भूमिका बजावली त्याला एरिक सोल्हेम यांनी दुजोरा दिला आहे. लिट्टे आणि श्रीलंकन सरकार यांच्यात युध्दबंदी करार होण्या अगोदर भारतीय गुप्तचर अधिकारी आणि लिट्टे यांच्यात गुप्त बैठक झाली होती असं सोल्हेम म्हणाले. लिट्टेने राजीव गांधींची हत्या केल्यानंतर भारताने १९९२ साली लिट्टे दहशतवादी संघटना घोषीत करुन बंदी घातली.
भारत सरकार आणि लिट्टे यांच्या गुप्त बैठक झाली तेंव्हा भाजपाचे सरकार सत्तेत होतं. श्रीलंकेची फाळणी करण्यास भारत सरकारचा तीव्र विरोध होता आणि तमिळ इलमला मान्यता देणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं. सोल्हेम यांनी भारतीय गुप्तचर संघटना रिसर्च ऍनालिसिस विंगच्या अधिकाऱ्यांची अनेकदा भेट घेतली. त्यातल्या अनेक भेटी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाल्या.

First Published: Sunday, November 13, 2011, 15:00


comments powered by Disqus