कोलकात्यात मार्केटमध्ये भीषण आग, ४ जखमी - Marathi News 24taas.com

कोलकात्यात मार्केटमध्ये भीषण आग, ४ जखमी

www.24taas.com, कोलकाता
 
कोलकात्यात भीषण आग लागून कोट्यवधी रूपयांचं नुकसान झालं आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हाथी बागान मार्केटला ही आग लागली. हाथी बागान मार्केट हे हार्डवेअरचं मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे.
 
आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र आगीत कोट्यावधी रूपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. हाथी बागान हे मार्केट कोलकातामधील अतिशय जुनं असं मार्केट आहे. हे मार्केट अतिशय गजबजलेल्या आणि वस्ती असलेल्या ठिकाणी असल्याने अग्निशामन दलाला आग विझविण्यात शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.
 
तसंच  ही आग जास्त पसरू नये ह्याची देखील काळजी अग्निशमन दलाकडून घेतली जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि रॅपिड फायर अॅक्शन दल दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसातीला आगीची ही तिसरी मोठी घटना आहे. या आगीमध्ये चार जण जखमी झाल्याचे समजते. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
 

First Published: Thursday, March 22, 2012, 08:48


comments powered by Disqus