सिरियातील हिंसाचारात ६९ जण ठार - Marathi News 24taas.com

सिरियातील हिंसाचारात ६९ जण ठार

झी २४ तास वेब टीम, मुंबई
सिरियाच्या दक्षिण भागात राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्याशी एकनिष्ठ असलेली फौज आणि सेनादलातून पळ काढणाऱ्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात ६९ जण ठार झाल्याचं वृत्त आहे. अरब लीगने सिरियाचे सदस्यत्व निलंबीत करण्याच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार भडकला आहे. असाद यांनी गेले आठ महिने त्यांच्या विरोधात असलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेनादलाचा वापर केला आहे.
 
सिरिया जागतिक स्तरावर एकाकी पडल्याचं चित्र आहे. गेल्या महिनाभरात शेकडो लोक मारली गेली आहेत. टुनेशिया, इजिप्त आणि लिबिया मध्ये झालेल्या जनआंदोलनाच्या उद्रेकानंतर तिथल्या सत्ताधाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं. सैन्यातून पळ काढणाऱ्या बंडखोरांबरोबर झालेल्या चकमकीत सिरियन सुरक्षा दलाचे ३४ सैनिक मारले गेल्याचं सिरियन ऑरगनायझेन फॉर ह्यूमन राईटसने म्हटलं आहे.
अल जझिराने दाखवलेल्या फूटेजमध्ये आगीने वेढलेला एक रणगाडा आणि जळणाऱ्या गाड्यांची दृष्ये दाखवली. सिरियातील दक्षिणेतील गावांमध्ये २३ गावकरी आणि १२ हल्लेखोर ठार झाल्याचं ब्रिटन स्थित ऑबझरव्हेटरीने म्हटलं आहे.

First Published: Tuesday, November 15, 2011, 17:11


comments powered by Disqus