Last Updated: Sunday, March 25, 2012, 20:34
www.24taas.com, नवी दिल्ली राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या परदेश वाऱ्यांवर सरकारी तिजोरीतून २०५ कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीच्या राष्ट्रपतींपेक्षा सर्वाधिक खर्च प्रतिभाताई पाटील यांच्या परदेश दौऱ्यांवर झाला आहे.
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाता पाटील यांनी जुलै २००७ मध्ये पदभार सांभाळला. त्यानंतर आजवर पाटील यांनी १२ वेळा परदेश दौरे केले असून चार खंडातील २२ देशांना भेटी दिल्या आहेत. राष्ट्रपतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यास अजून चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे आणि बहुधा त्या दक्षिण आफ्रिकेला भेट देण्याची शक्यता आहे.
माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीच्या आधारे आतापर्यंत एअर इंडियाला प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्यांसाठी १६९ कोटी रुपयांचा खर्च चार्टड विमानं पुरविण्यासाठी आला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी नेहमी ७४७-४०० बोईंग विमानाची व्यवस्था करावी लागते. राष्ट्रपतींसमवेत बहुतेक वेळा त्यांचे कुटुंबातील सदस्यही असतात. भूतानच्या दौऱा फक्त राष्ट्रुपतींनी छोट्या विमानाने केला होता.
याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयाने निवास व्यवस्था, दैनंदिन भत्ते, स्थानिक प्रवास व्यवस्था आणि इतर खर्च यासाठी ३६ कोटी रुपये खर्च केले असल्याचं मंत्रालयाने दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होतं. गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत माहितीच्या अधिकाऱाखाली ही माहिती उघड झाली आहे. संबंधित यंत्रणा माहिती देण्यास फार उत्सुक नव्हत्या असंही उघडकीस आलं आहे.
एअर इंडियाच्या विमानांसाठी संरक्षण मंत्रालय बिल भरतं त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला उत्तर देताना फारच थोडी माहिती दिली. संरक्षण मंत्रालयाने आतापर्यंत एअर इंडियाला १५३ कोटी रुपये दिले तर १६ कोटी रुपये अदा केलेले नाहीत. पाटील यांनी आतापर्यंत ब्राझिल, मेक्सिको, चिले, भूतान, विएतनाम, इंडोनेशिया, स्पेन, पोलंड, रशिया, ताजिकीस्तान, युनायटेड किंग्डम , चीन, सायप्रस, लाओस, कंबोडिया, संयुक्त अरब आमिरात, मॉरेशिस, दक्षिण कोरिया, स्वितर्झलँड, ऑस्ट्रिया या देशांना भेटी दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी एकूण ७९ दिवस परदेशात वास्तव्य केलं.
याआधीचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सात परदेश दौऱयांमध्ये १७ देशांना भेटी दिल्या होत्या. त्याआधीचे राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी सहा दौऱ्यांमध्ये १० देशांना भेटी दिल्या होत्या.
First Published: Sunday, March 25, 2012, 20:34