Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:30
www.24taas.com, नवी दिल्ली कोट्यवधी छोट्या गुंतवणूकदारासाठी एक खूशखबर! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आणि मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) या सारख्या पोस्टातील योजनांवरील व्याजदर ०.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अमंलबजावणी १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधीचा सध्या असलेला व्याज दर ८.६ टक्क्यावरून ८.८ टक्के करण्यात येणार आहे. तर मासिक उत्पन्न योजनेचा सध्या असलेला व्याज दर ८.२ वरून ८.५ टक्के करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पोस्टात एक किंवा दोन वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर सध्या ८.२ टक्के व्याज मिळते ते आता ८.३ टक्के मिळणार आहे.
सरकारने अशा प्रकारे व्याज दर वाढवून बँकांवर गुंतवणुकीवरील व्याजदर वाढविण्यासाठी दबाव आणल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तसेच पाच आणि दहा वर्षाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (एनएससी) आता ८.६ ऐवजी ८.९ टक्के व्याजदर मिळणार आहे. मात्र, पोस्टात सुरू केलेल्या बचत खात्यावरील व्याजदर ४ टक्केच राहणार आहे.
First Published: Tuesday, March 27, 2012, 16:30