सरकार लष्करप्रमुखांची हकालपट्टी करणार का? - Marathi News 24taas.com

सरकार लष्करप्रमुखांची हकालपट्टी करणार का?

www.24taas.com, नवी दिल्ली
 
लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलावली. लष्करप्रमुखांनी सेनादलाकडे असलेला शस्त्रसाठ्याच्या कमतरतेने आणि यंत्रणेतील त्रुटींमुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेला धोका असल्याचा इशारा आपल्या पत्रात दिला आहे. लष्करप्रमुखांच्या पत्रामुळे विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घालत सरकार देशाच्या संरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा घणाघाती आरोप केला आहे. पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला संरक्षण मंत्री ए.के.ऍन्टोनी, गृहमंत्री पी.चिदंबरम आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी उपस्थिती लावली.
 
गोपनीय माहिती जाहिर केल्याच्या कारणावरुन लष्कर प्रमुखांची हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी तसंच काँग्रेस पक्षातील काहींनी केली आहे. सेनादलाच्या रणगाड्यांमध्ये दारुगोळ्याची कमतरता, हवाईदलाकडे असलेल्या शस्त्रसामुग्रीच्या साठ्या पैकी ९७ टक्के साठा निकामी असल्याचं तसंच पायदळाकडे अत्यावश्यक शस्त्रास्त्र नसल्याचं लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना १२ मार्च रोजी पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
 
 
त्याआधी सेनादलासाठी वाहनखरेदीच्या निविदा प्रक्रियेत एका विशिष्ट कंपनीच्या ट्रकला मंजुरी देण्यासाठी लष्करातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्याला १४ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती असं खळबळजनक विधान लष्करप्रमुखांनी केलं होतं. आज लष्करप्रमुखांच्या पत्रामुळे संसदेत गोंधळाला उत्तर देताना एन्टोनी यांनी सरकार यावर गांभीर्याने विचार करत असल्याचं आणि त्रुटी दूर करण्याबाबत पावलं उचलण्यात आल्याचं सांगितलं.
 

First Published: Wednesday, March 28, 2012, 13:25


comments powered by Disqus