ऐन उन्हाळी सुट्टीत हॉटेलिंग महागले - Marathi News 24taas.com

ऐन उन्हाळी सुट्टीत हॉटेलिंग महागले

www.24taas.com, नवी दिल्ली
 
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त  तुमचा मस्त फिरण्याचा मूड असेल  आणि हॉटेलमध्ये उतरण्याचा विचार असेल तर बजेट वाढवा. कारण  पंचतारांकितपासून ते मिडीयम, छोट्या हॉटेलचं भाडं वाढणार आहे. सर्व्हिस टॅक्स वाढल्यानं हॉटेलिंग महाग होणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये हॉटेलचे दर चढेच असतात. मात्र यंदा ग्राहकांना त्यापेक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण अर्थसंकल्पात सर्व्हिस आणि एक्साईज ड्यूटीमध्ये वाढ करण्यात आल्यानं हॉटेलिंग ५ ते १० टक्क्यानं महागलंय. समर व्हॅकेशनमध्ये स्थानिक पर्यटकांची संख्या जास्त असतेच. रुपयाचं मूल्य घसरल्यामुळं यंदा परदेशी पर्यटकही जास्त संख्येने येत आहेत. त्यामुळं हॉटेल क्षेत्रात मागणी चांगली आहे.
 
फाईव्ह स्टार हॉटेलचा विचार केला तर सामान्य रुमचं भाडंही वाढलेलं आहे. मुंबईतल्या ताज हॉटेलचं एका रुमचं भाडं २०-२२ हजारांवरुन २२ ते २५ हजार रुपये, आयटीसी ग्रॅंड मराठामध्ये १०-१२ हजारांवरुन ११ ते १३ हजार, तर हॉटेल लीलाचं सरासरी रुमचं भाडं  ८ ते १० वरुन ९ ते ११  हजार रुपये असेल. मागणी आणि पुरवठ्यातलं अंतर वाढलं तर तुमच्या खिशाला आणखी झळ बसू शकते.
 
केवळ मोठी हॉटेल्स नाही तर मध्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये राहणंही आता महागणार आहे. मुंबईचा विचार केला तर, 'प्रीमीअर इन' मधील रुमचं भाडं पाच हजार आहे. त्यात ५०० रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित आहे. तर 'जिंजर' सारख्या बजेटमध्ये असणाऱ्या हॉटेलच्या रुमचं भाडंही चार हजारांवरुन साडेचार हजार होणार आहे. पुढच्या १५ दिवसात नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे.
 

First Published: Friday, April 6, 2012, 11:47


comments powered by Disqus