Last Updated: Wednesday, April 11, 2012, 08:54
www.24taas.com, अहमदाबाद गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी एसआयटीनं सादर केलेल्या अहवालात मोदींना क्लीन चीट देण्यात आली आहे. जनरल वी के सिंह यांनी लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंहांनी लाच देऊ केल्याची तक्रार सीबीआयकडे नोंदवली आहे.
गोध्रा जळीत कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमुळे कलंकित ठरलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मंगळवारी या प्रकरणी दिलासा मिळाला. गुलबर्ग येथे झालेल्या हत्याकांड प्रकरणात मोदी यांचा सहभाग असल्याबाबतचा पुरावा न आढळल्याने सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने त्यांना मंगळवारी क्लीन चीट दिली. याबाबत तक्रारदाराची बाजू ऐकल्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय महानगर न्यायदंडाधिकारी एम. एस. भट्ट देणार आहेत. या अहवालाची प्रत तसेच संबंधित कागदपत्रे झकीया यांना ३० दिवसांच्या आत द्यावीत, असा आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीत सुमारे एक हजार नागरिक ठार झाले होते, यातील बहुतांश मुस्लिम होते. या हत्याकांडात काँग्रेसचे खासदार एहेसान जाफरी यांच्यासह ६९ जण मारले गेले होते. जाफरी यांची पत्नी झकीया यांनी मोदी तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, पोलीस अधिकारी आणि भाजपच्या पदाधिकारी अशा एकूण ५७ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आर. के. राघवन यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने दिलेल्या अंतिम अहवालात या प्रकरणी मुख्यमंत्री मोदी तसेच अन्य आरोपींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याचे स्पष्ट केले. मात्र, हा अहवाल स्वीकारणे अथवा नाकारणे हे सर्वस्वी महानगर न्यायदंडाधिकारी देणार असल्याने मोदींवर अद्यापही टांगती तलवार आहे.
First Published: Wednesday, April 11, 2012, 08:54