Last Updated: Wednesday, April 18, 2012, 15:25
www.24taas.com, नवी दिल्ली दूध संकलन करणा-या डेअरींनी कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप दूध उत्पादक शेतक-यांनी केला आहे. यासंदर्भात ग्वाल गद्दी नामक संघटनेनं २१ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रस्त्यावरच दुधाचे टँकर्स रिकामे करून दूध उत्पादक शेतकरी, डेअरींविरोधातला राग व्यक्त करत आहेत. गेल्या सहा वर्षांत दुधाचे दर दुप्पट झाले, पण त्या तुलनेत शेतक-यांना त्याचा फायदा झाला नाही. मागच्या वर्षी उन्हाळ्यात शेतक-यांकडून ३२ रुपये प्रति लिटर प्रमाणे दुधाची खरेदी केली गेली. मात्र, सप्टेंबरनंतर अचानक हा खरेदी दर १८ रुपयांवर आला. असं असतांनाही बाजारात मात्र दुधाची विक्री ४०रुपये दरानेच झाली. त्यामुळे डेअरींकडून वर्षभरात ६ लाख कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय.
शेतक-यांकडून १८ रुपये दराने दुधाची खरेदी केल्यानंतर, डेअरीपर्यंत दूध पोहोचवण्याचा खर्च ६० पैसे, प्रोसेसिंग खर्च ४२ पैसे आणि दळणवळणाचा खर्च ३० पैसे, असा एकूण २२ रुपये दूध कंपन्यांना खर्च येतो. असं असलं तरी बाजारात दुधाचे दर गगनाला भिडले आहेत.
डेअरीतून पुरवठा केल्या जाणा-या दुधाचं प्रमाण, शेतक-यांकडून येणा-या दुधाच्या प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त आहे. याचाच अर्थ डेअरी कंपन्या दुधात भेसळ करून नफेखोरी करत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. डेअरी कंपन्यांकडून शेतक-यांचे ६ लाख कोटी रुपये परत मिळवण्यासाठी ग्वाल गद्दी समिती पंतप्रधानांना पत्र पाठवणार आहे. यासोबतच दुधाचा दर ३२ रुपये करून देशभरात दूध मंडई स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
First Published: Wednesday, April 18, 2012, 15:25