ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ रडली - Marathi News 24taas.com

ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ रडली

झी २४ तास वेब टीम, कोलकता


माओवादी नेते किशनजी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्याचं वृत्त कळताच त्यांच्या आजारी आईचा बांध फुटला आणि ती कोसळली. मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी हे ओसमानिया विद्यापीठात विद्यार्थी असताना भूमीगत झाले त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना पाहिलं नव्हतं.

किशनजींनी १९७४ साली रॅडिकल स्टुडंट युनियनमध्ये प्रवेश केला आणि चार वर्षानंतर ते भूमीगत झाले. किशनजींच्या कुटुंबियांची आणि त्यांची गेल्या तीन दशकात भेट नाही. पण त्यांच्या कुटुंबियांनी पश्चिम बंगाल सरकारला त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी ताब्यात देण्याची विनंती केली आहे. क्रांतीकारी कवी पी वरवरा राव यांना देखील किशनजींच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर अश्रू अनावर झाले.

किशनजींचा जन्म १० ऑक्टोबर १९५३ साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला. शोषितांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी किशनजीं लहान वयातच नक्षली चळवळीत सहभागी झाले. किशनजींचे संघटनात्मक कौशल्याने पिपल्स वॉर ग्रुपचे संस्थापक कोंडापल्ली सितारामय्या प्रभावीत झाले आणि त्यांनी किशनजींची निवड पीडब्ल्युजीच्या राज्य सचिवपदी केली. नक्षलवादी चळवळीत किशनजी अचूक रणनिती आखण्यासाठी प्रसिध्द होते आणि १९८४ साली ओसमानिया रुग्णालयातून सितारामय्यांच्या नाट्यमय पलायनाची योजना त्यांनीच आखली होती.


पक्षाच्या आदेशानुसार ते छत्तीसगढमध्ये चळवळीच्या कामासाठी गेले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओस्टिच्या निर्मितीसाठी पिपल्स वॉर ग्रुप आणि माओस्टि कम्युनिस्ट सेंटरच्या विलिनीकरणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. सीपीआय माओस्टिचे ते पॉलिटब्युरो सदस्य होते आणि पश्चिम बंगालमधल्या सीपीआय-माओस्टिचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. पक्षाचे ते तिसऱ्या क्रमांकाचे नेते होते आणि त्यांना पकडण्यासाठी १९ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. किशनजींचा लहान भाऊ वेणूगोपाळ राव हाही सेंट्रल कमिटीचा सदस्य आणि तो आंध्र-ओरिसाच्या सीमावर्ती भागात सक्रिय आहे.

First Published: Friday, November 25, 2011, 13:36


comments powered by Disqus