दिल्ली दरबारी सरकारने पसरले हात... - Marathi News 24taas.com

दिल्ली दरबारी सरकारने पसरले हात...

www.24taas.com, नवी दिल्ली
 
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांचाही समावेश आहे. राज्यातले केंद्रीय मंत्री आणि सर्वपक्षीय खासदारही या बैठकीत उपस्थिती लावणार आहेत.
 
या भेटीदरम्यान २२८१ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात येणार आहे. तसंच पाच लाख मेट्रीक टन धान्याचीही मागणी केंद्र सरकारकडं करण्यात येणार आहे. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत पंतप्रधानांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र नेमकी किती मदत केंद्र सरकार देणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
 
तत्पूर्वी दुष्काळाच्या पॅकेजची मागणी करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह सोनिया गांधींची भेट घेतली आहे. दुष्काळ निवारणाच्या मदतीसंदर्भात सोनिया गांधींशी चर्चा करण्यात आली. या भेटीत काँग्रेसच्या मंत्र्यांसह राज्याचे प्रभारी मोहन प्रकाशही उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे मंत्रीही पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची स्वतंत्र भेट घेणार आहेत.
 
 
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 12:45


comments powered by Disqus