Last Updated: Sunday, April 27, 2014, 12:45
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली वाघांना वाचवणं यासाठी भारतात अनेक प्राणिसंग्रहालयात प्रयत्न सुरू असताना, एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात प्रणय प्रक्रियेसाठी आणलेल्या एका वाघानं झिनझिन नावाच्या `रॉयल बेंगॉल` वाघिणीवर हल्ला करून तिला ठार केलंय. झिनझिन वाघिण ही गेली 10 वर्षे दिल्ली प्राणिसंग्रहालयात राहत होती.
`दी नॅशनल झूलॉजिकल पार्क`मध्ये तीन वाघिणींची संकरप्रक्रिया घडवण्यासाठी भोपाळ प्राणिसंग्रहालयातून दोन वाघ आणले होते. शुक्रवारी प्राणिसंग्रहालय बंद असल्या कारणानं संकरक्रिया करण्यासाठी अधिकार्यांनी एका वाघाला झिनझिन वाघिणीच्या पिंजऱ्यात सोडलं. आधी दोघांमध्ये गुरगुरणं सुरु झालं आणि अचानक त्या दोघांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. हा प्रकार पाहताच प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचार्यांनी काठय़ा आणि लोखंडी सळ्य़ांचा वापर करून दोन्ही वाघांना दूर करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत झिनझिन वाघिणीचा मृत्यू झाला होता.
प्राणिसंग्रहालयात असणाऱ्या पशुवैद्यक डॉ. एस. पन्नीरसेल्वम यांनी सांगितलं की, पहिल्यांदा भेटल्यावर प्राण्यांमध्ये अशी तुरळक झटापट होते, पण या वेळी तर नरानं मादीवर खूपच क्रूरपणे हल्ला चढविला. कदाचित जंगलात हा प्रकार घडत असेल, पण प्राणिसंग्रहालयात हा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. या प्रकारानंतर प्राणिसंग्रहालयात संकरक्रिया करण्याचा प्रयोग करायचा की नाही, याचा विचार करण्याची वेळ अधिकार्यांवर आली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 27, 2014, 12:45