Last Updated: Friday, October 18, 2013, 07:59
www.24taas.com ,वृत्तसंस्था, लखनऊउत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या किल्ल्यातलं एक हजार टन सोन्याचं रहस्य उलगडणार आहे. महाखजिन्याचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये एक हजार टन सोन्याचं रहस्य लवकरच उलगडणार आहे. किल्ल्यातला हा महाखजिना शोधण्यासाठी आजपासून खोदकामाला सुरूवात होणार आहे. काय आहे हे एक हजार टन सोन्य़ाचं रहस्य. हा विशेष रिपोर्ट.
उत्तर प्रदेशातील उन्नावच्या दोडियाखेडातल्या या किल्ल्याचं अवघ्या काही तासांत रहस्य उलगडणार आहे. एक हजार टन सोन्याचा खजिना शोधण्यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. खोदकामासाठी पुरातत्व विभागानं मोठ-मोठी यंत्रे मागवली असून शुक्रवारपासून या महाखजिन्याचा शोध सुरू होणार आहे.
उन्नावमधल्या दोडियाखेडाच्या या खजिन्याचं रहस्य एका साधूच्या स्वप्नातून समोर आलंय. या साधूचं नाव आहे शोभन सरकार. बक्सरचा राजा राव राम बक्स सिंह यांनी स्वप्नात येऊन या खजिन्याची माहिती दिल्याचा दावा या साधूनं केलाय.
राजा राव राम बक्शसिंह हे त्यांच्या वंशावळीतले पंचवीसावे राजे होते. १९ व्या शतकात दोडियाखेडा परिसरात त्यांची राजवट होती. इंग्रजांनी १८५७ साली इंग्रजांनी त्यांची हत्या केली. मात्र राजाचा आत्मा किल्लातल्या खजिन्याचं आजही संरक्षण करत असल्याची इथल्या जनतेची समजूत आहे.
दरम्यान खजिन्याची चर्चा सुरू होताच दावा ठोकण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. स्वत:ला राजाचे वंशज समजणारे या खजिन्यावर हक्क सांगत आहे. मात्र केंद्रीयमंत्री चरणदास महंत यांनी या खजिन्यावर केवळ देशाचाच अधिकार असल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणातली सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे शोभन सरकार या साधूनं पत्र लिहिल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी लगेचच पुरातत्व विभागाला या खजिन्याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्य़ामुळं या किल्ल्यात महाखजिना सापडतो का याकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 18, 2013, 07:42