‘वंदे मातरम’ इस्लामविरोधी, खासदारानं केला अवमान , Vande Mataram un-Islamic

‘वंदे मातरम’ इस्लामविरोधी, खासदारानं केला अवमान

‘वंदे मातरम’ इस्लामविरोधी, खासदारानं केला अवमान
www.24taas.com, नवी दिल्ली

लोकसभेत ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सुरू झाल्या झाल्या बसपा खासदार शफीकुर्र रेहमान बर्क यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला. राष्ट्रीय गीताचा अपमान करणाऱ्या या खासदाराच्या वागणुकीवर लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनीदेखील नाराजी व्यक्त केलीय. मात्र, बर्क यांचं म्हणणं काही वेगळंच आहे. त्यांच्या मते, ‘वंदे मातरम हे इस्लामविरोधी आहे.’

बर्क यांच्या वर्तवणुकीवर नाराज झालेल्या लोकसभा अध्यक्षांनी खासदारानं भविष्यात असं वर्तन करू नये, अशी सूचना केलीय. मात्र, बर्क यांनी ही सूचना मानण्यास नकार दिलाय. ‘मी वंदे मातरम या गीताला इस्लामविरोधी मानतो. इस्लाम यासाठी परवानगी देत नाही. म्हणून मी जाणूनबुजून त्याचा बहिष्कार केलाय आणि मला लोकसभा अध्यक्षांकडूनही कोणतीही नोटीस मिळालेली नाही. मी भविष्यातही वंदे मातरमसाठी उभं राहणार नाही’ असं विधान त्यांनी केलंय. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

‘१९९७ सालच्या स्वातंत्र्य दिनालाही एका कार्यक्रमात मी असंच केलं होतं. वंदे मातरमचा संविधानातही उल्लेख नाही. मी राष्ट्रगीताचा आदर करतो पण वंदे मातरमचा मी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार करणार नाही आणि असं करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही’ असं म्हणत बर्क यांनी तारे तोडलेत.

भाजपनं मात्र बर्क यांच्या वागण्याचा जोरदार निषेध केलाय. बर्क यांनी केवळ राष्ट्रीय गीताचाच नव्हे तर संसदेचाही अपमान केल्याचं भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 12:08


comments powered by Disqus