Last Updated: Tuesday, January 28, 2014, 12:47
www.24taas.com, झी मीडिया, कोच्ची सोशल मीडियावर कमेंट आणि अश्लील संदेश यांवरून अनेक अप्रिय घटना घडल्याचं गेल्या काही काळात सतत दिसून येतंय. नुकत्याच घडलेल्या घटनेत फेसबुकवरून मिळालेल्या एका अश्लील संदेशामुळे एका महिलेनं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय.
सोशल वेबसाईट फेसबुकवर मिळालेला हा संदेश पाहून महिलेनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं उघड झालंय. कोच्चीजवळच चेरनल्लोकरमध्ये ही घटना घडलीय. २७ वर्षांच्या एका महिलेला फेसबुकवर टाकलेल्या संदेशांनंतर आपला अपमान सहन न झाल्यानं तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडलीय. ज्या व्यक्तीनं या महिलेला अश्लील मॅसेजेस पाठवले होते त्याच्याविरुद्ध तीनं या अगोदर पोलिसांमध्ये तक्रारदेखील दाखल केली होती. परंतु, यानंतरही त्याच्या हरकती थांबल्या नाहीत. त्याचं तिला फेसबुकवर आणि मोबाईलवर अश्लील पाठवणं सुरूच होतं.
कुटुंबीयांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनं जेव्हा या आरोपीविरुद्ध पोलिसांशी संपर्क साधला होता तेव्हा पोलिसांनी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नव्हती. तेव्हा या महिलेनं केरळ उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता. यावेळी न्यायालयानं, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ३० वर्षीय आरोपी या महिलेचाच नातेवाईक होता आणि महिलेला बदनाम न करण्याविषयी त्याला समजही दिली गेली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 12:45