`ओबामांच्या त्या पत्रावर आम्ही सह्या केल्याच नाहीत!` We Did not sign the letter Obama received

ओबामांच्या 'त्या' पत्रावर आम्ही सह्या केल्याच नाहीत!

ओबामांच्या 'त्या' पत्रावर आम्ही सह्या केल्याच नाहीत!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नरेंद्र मोदींना अमेरिकेनं विसा देऊ नये, यासाठी 65 खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लिहिलेल्या पत्रावरून नवा वाद उफाळलाय. आपण या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचा दावा सीताराम येचुरींसह 9 खासदारांनी केलाय. तर दुसरीकडे मोदींनी विसासाठी अर्ज केल्यास त्याबाबत विचार करता येईल, असा पवित्रा अमेरिकेनं घेतलाय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवलेल्या या पत्रावर एक नजर टाकूया... 26 नोव्हेंबर 2012 रोजी हे पत्र पाठवण्यात आलंय. त्यावर विविध पक्षांच्या 65 खासदारांनी स्वाक्ष-या केल्यात. गुजरात दंगलीला जबाबदार असलेल्या जातीयवादी नरेंद्र मोदींना अमेरिकेने विसा देऊ नये, अशी विनंती ओबामांना पाठवलेल्या या पत्रात करण्यात आलीय. पण या पत्रावर आपण स्वाक्षरीच केलेली नाही, असं येचुरींचं म्हणणं आहे. कुणीतरी आपल्या खोट्या सह्या केल्या असाव्यात, असं येचुरींनी सांगितलं.

एकटे येचुरीच नव्हे तर, राष्ट्रवादीचे खासदार वंदना चव्हाण, संजीव नाईक, काँग्रेस खासदार मारोतराव कोवासे, अनिल लाड, जयवंतराव आवळे, सीपीएम खासदार के. पी. रामलिंगम, सीपीआय खासदार अच्युतन यांनीही या वादग्रस्त पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे येचुरींसह या सर्व खासदारांनी त्यावर सह्या केल्यात, असं या पत्रासाठी पुढाकार घेणारे अपक्ष राज्यसभा खासदार मोहम्मद अदीब सांगतायत.

मोदींच्या विरोधातील पत्रावर खासदारांच्या बनावट सह्या केल्याचा वाद उफाळून आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपनं केलीय. तर यामध्ये दोषी आढळल्यास शिक्षा भोगायला आपण तयार आहोत, असं आव्हान अदीब यांनी दिलंय. विशेष म्हणजे या वादावरून आता सरकारनं देखील हात झटकलेत...

2002 सालच्या गुजरात दंगलीनंतर अमेरिकेनं मोदींना विसा देण्यास वारंवार नकार दिलाय. मोदींवरील ही नो एंट्री यापुढंही कायम राहावी, अशा आशयाचं वादग्रस्त पत्र भारताच्या 65 खासदारांनी पाठवलंय. या पत्रातील सह्यांवरून वाद रंगला असताना, मोदींनी विसासाठी नव्यानं अर्ज करावा, अमेरिकेच्या धोरणांनुसार त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असं आता अमेरिकेचे प्रवक्ते जेन साकी यांनी सांगितलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 17:04


comments powered by Disqus