Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:24
www.24taas.com, नवी दिल्लीदिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश हादरलेला असतानाच राजधानीत आणखी एका ४२ वर्षीय महिलेवर तिघा नराधमांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दिल्लीतील कालकाजी परिसरात ही घटना घडली. ही पीडित महिला जयपूरमधील आहे. ती वृंदावनमार्गे दिल्लीत येत होती. बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकण्यात आले. गंभीर बाब म्हणजे ओळखीच्या व्यक्तीनेच दगाबाजी केल्याने हा प्रसंग संबंधित महिलेवर ओढवला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या जबाबात महिलीने सांगितले आहे.
दिलीप वर्मा असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तो वृंदावन भागात गाईडचे काम करतो. दिल्लीत जाण्यासाठी या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दिलीपने गाडीत घेतले. गाडीत आधीच अन्य दोघे जण तसेच एक महीला आणि लहान बाळ होते. पण दिल्लीत पोहोचण्याआधीच दुसरी महिला बाळाला घेऊन गाडीतून उतरली. त्यानंतर गाडीतील तिघाही जणांनी या महिलेवर बलात्कार केला. या महिलेकडील पैसे काढून घेतानाच मारहाण करून तिला रस्त्यावर फेकून हे नराधम पसार झाले.
या असहाय महिलेला मदत करण्यासाठी तेथे कोणीच नव्हते. तिने आपल्या एक मैत्रीणीला फोन लावून तेथे बोलावून घेतले. त्यानंतर कसेबसे कालकाजी पोलीस ठाणे गाठून याबाबत महिलेने तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या शरीरावर चाकूचे वारही करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दोघेजण अद्यापी फरार आहेत.
First Published: Thursday, December 27, 2012, 18:24