Last Updated: Sunday, June 23, 2013, 12:45
www.24taas.com, झी मीडिया, लाहोर लग्नाला नकार दिल्यानं चिडलेल्या तरुणानं एका अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलंय. पाकिस्तानात ही धक्कादायक घटना घडलीय. हल्लेखोर ‘पख्तूनख्वा’ या भागातील रहिवासी आहे.
चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये काम करणारी १८ वर्षीय अभिनेत्री बुशरा हिच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवलाय. बुशरानं लग्नाला नकार दिल्यामुळे एका अज्ञात इसमानं तिच्यावर अॅसिड हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झालीय आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. हा हल्ला झाला तेव्हा बुशरा पख्तूनख्वा शहरातील आपल्या घरात झोपली होती.
बुशराच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर त्यांच्या घराच्या भिंतीवर चढला आणि अॅसिड फेकून पळाला. त्यानंतर तात्काळ बुशराला पेशावर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बुशराचा चेहरा आणि तिचा खांदा ३३ टक्के भाजलाय. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या घटनेनंतर, परवेज खान या बुशराच्या भावानं तिच्या मागील चित्रपटाचा निर्माता शौकत खान याच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीय. शौकत खाननंच हे कृत्य केलं असावं, असा आरोप परवेजनं केलाय. शौकत खान यानं बुशराला लग्नासाठी विचारलं होतं पणं बुशरानं त्याला साफ नकार दिला होता, असं परवेजनं म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 23, 2013, 12:10