Last Updated: Tuesday, March 5, 2013, 12:24
www.24taas.com, नाशिकनाशिकच्या द्राक्षांचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचला असला तरी अमेरिकेला मात्र ही द्राक्षं आंबट लागत आहेत. FDI ला केंद्र सरकारने मान्यता दिलेली असताना अमेरिका द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी निर्माण करत आहे.
देशातून होणा-या द्राक्ष निर्यातीपैकी पंचाहत्तर टक्के निर्यात ही महाराष्ट्रातून होते. जगभरातील जवळपास ९३ देशांमध्ये नाशकातील द्राक्ष पोहोचतात...नेदरलँड, बांग्लादेश, युएई, ब्रुसेल्स, सौदी अरेबिया, थायलंड, स्वीडन, श्रीलंका तसंच नेपाळ आणि मलेशिया या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होते. मात्र जगभरात चवीने खाल्ल्या जाणा-या या द्राक्षांची चव अमेरिकेला आंबट लागत आहे. अमेरिकेने २००९ मध्ये ६७ लाख तर गेल्या वर्षी केवळ ३ कोटी रुपयांची द्राक्ष आयात केली आहे. व्यापारविषयक वाटाघाटीत दुग्धजन्य पदार्थ अमेरिकेकडून विकत घेतले, तरच भारत्तीय द्राक्ष घेतली जातील अशी आडमुठी भूमिका अमेरिकेने घेतली आहे.
गेल्या तीन वर्षात जगभरातील ९३ देशांना भारताने द्राक्ष विकून साडेपंधराशे कोटी रुपयांचं परकीय चलन मिळवलं. द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा वाटा सत्तर टक्के असल्याने अमेरिकेच्या या भूमिकेमुळे नाशिकच्या शेतक-यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे.
डॉलर हे चलन इतर आशियायी तसंच अरब देशांच्या तुलनेत सर्वाधिक मूल्य देणारं चलन आहे. त्यामुळे द्राक्षांची निर्यात अमेरिकेला झाल्यास डॉलरच्या रुपाने त्याचा थेट फायदा नाशिकच्या कृषी उत्पादनावर होणार आहे. चीनप्रमाणे आता अमेरिकाही अशी आडमुठी भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांचं नाहक नुकसान होतंय.
First Published: Monday, March 4, 2013, 17:27