Last Updated: Wednesday, March 13, 2013, 12:55
www.24taas.com, व्हॅटिकन सिटी आगामी पोप कोण असणार हे भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीपर्यंत ठरू शकलेलं नाही. बेनेडिक्ट १६वे यांच्या राजीनाम्यानंतर पुढील पोप कोण असणार याबाबत निवडणुक प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री पोप निवडीसाठी आयोजित निवड प्रक्रियेत कोणताच निकाल हाती आला नाही. पोप हे ख्रिश्चन धर्मातील सर्वोच्च स्थान असते. त्यामुळे संपूर्ण जगाचे ह्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
व्हॅटिकन सिटीच्या सिस्टीन चॅपलच्या छतावर एक चिमणी लावण्यात आली आहे. या चिमणीतून जेव्हा सफेद धूर निघू लागेल तेव्हा नागरिकांना समजेल की, नवे पोप निवडण्यात आले. पण मध्यरात्री त्या चिमणीतून काळा धूर बाहेर आला. तेव्हाच लोकांना समजले की, अजूनही नव्या पोपची निवड झालेली नाही.
जर का त्या चिमणीतून सफेद धूर येऊ लागला तर असे समजले जाते की, नव्या पोपची निवड झालेली आहे. जगभरातील ११५ कार्डिनलने गुप्त मतदान केले. मात्र त्यांच्या मतदानानंतर नव्या पोपची निवड होऊ शकली नाही. आणि त्यामुळे प्रातिनिधीक स्वरूपात व्हॅटिकन सिटीच्या सिस्टीन चॅपलच्या त्या चिमणीमधून काळा धूर येऊ लागला.
पोपपदासाठी सध्या इटलीमधील मिलान येथील आर्कबिशप एंगेलो स्कोला आणि ब्राझीलचे ओडिलो स्केयरर यांच्यातच प्रमुख दावदेरी असल्याचे समजते. मात्र या दोघांना दोन तृतीयांश मत मिळविणं गरजेचं आहे. आणि जेव्हा नव्या पोपची निवड झाली नाही. त्यानंतर त्या गुप्त मतदानपत्रिका जाळण्यात आल्या.
त्यामुळे आता पुन्हा एकदा निवड प्रक्रियेला सुरवात होईल. हे कार्डियल तोपर्यंत रोज चारवेळा मतदान करतील. जो पर्यंत कोणत्याही एका उमेदवाराचे नाव निश्चित होणार नाही. तोपर्यंत रोज सकाळ आणि सध्यांकाळ दोन दोन वेळेस मतदान होणार आहे. जेव्हा नवे पोप निवडून येतील तेव्हा चिमणीतून सफेद धूर सोडण्यात येईल. जो कोणी नवा पोप असेल तो १.२ अब्ज कॅथलिक नागरिकांचे नेतृत्व करेल.
First Published: Wednesday, March 13, 2013, 12:52