भ्रष्टाचारी मंत्र्याला सुनावली फाशीची सजा!, China`s former railway minister gets suspended death in corruption case

भ्रष्टाचारी मंत्र्याला सुनावली फाशीची सजा!

भ्रष्टाचारी मंत्र्याला सुनावली फाशीची सजा!
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग

भ्रष्टाचारी मंत्र्याला... आणि फाशीची शिक्षा... तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय? नाही ही मस्करी नाही... चीनमध्ये खरोखऱच एका माजी रेल्वेमंत्र्यानं भ्रष्टाचार केला म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

चीनचे माजी रेल्वेमंत्री लियू झिजून यांना भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग करणं या गुन्ह्यांकरिता देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. त्यांना दोन वर्षांनंतर मृत्युदंड दिला जाईल. बीजिंगच्या इंटरमिडिएट पीपल्स न्यायालयाने ६० वर्षांच्या लियू याच्याविरुद्ध हा कठोर निकाल दिला आाहे.

लियू यांच्यावर २५ वर्षांच्या कार्यकाळात १ कोटी ५ लाख ३० हजार डॉलर्सची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. या आरोपावर निर्णय देताना ‘लियू यांच्या गुन्ह्यांसाठी देण्यात येणारी शिक्षा दोन वर्षांच्या कारावासानंतर मृत्युदंडाची राहील’ असं स्पष्ट करण्यात आलंय. सत्तेत असताना पदाचा दुरुपयोग करण्यासाठी त्यांना १० वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली. पण संयुक्त अपराधासाठी लियू यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेलीय. त्यांना आयुष्यभर राजकीय अधिकारांपासून वंचित करणं व त्यांची सर्व संपत्ती जप्त करणं हे देखील या शिक्षेत सामील आहे. लियू २००३ ते २०११ या काळात रेल्वेमंत्री होते.

एकेकाळी चांगलंच प्रकाशझोतात आलेलं चीनचं रेल्वे मंत्रालय मार्चमध्येच बरखास्त करण्यात आलंय. चीनमध्ये भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले आहेत.

भारतात मात्र, भारतीय रेल्वे प्रमोशनसाठी लाच प्रकरणात समाविष्ट असलेल्या माजी रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांच्याविरुद्ध सीबीआयनं कोणताही खटला दाखल केलेला नाही. कारण चौकशी समितीकडे त्यांच्याविरुद्ध ठोस पुराव्यांचा अभाव आहे. त्यामुळे सीबीआयनं केवळ बन्सल यांच्या भाचा व्ही. के. सिंग याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात गुंतलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 11:57


comments powered by Disqus