सीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी Consult Americans before striking Syria: US lawmakers Obama

सीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी

सीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी
www.24taas.com , झी मीडिया,वॉशिंग्टन

सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.

सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांच्या विरोधातील आंदोलकांना चिरडण्यासाठी दमास्कसमध्ये गेल्या आठवडय़ात झालेला नरसंहार सीरियाला महाग पडण्याची चिन्हं आहेत. २१ ऑगस्टला रासायनिक अस्त्रांच्या सहाय्यानं झालेल्या या हल्ल्यात सुमारे १,३०० नागरिक बळी पडले होते. अमेरिकेसह अनेक पश्चिमी देशांनी या हल्ल्याचा निषेध केला रशियाने मात्र सीरियाला पाठिंबा देत सीरियावर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दोस्त राष्ट्रांना दिलाय.

मात्र सीरियात रासायनिक अस्त्रांच्या सहाय्यानं केलेल्या हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी त्यांच्यावर लष्करी कारवाई करणं जवळपास निश्चित झालं असून त्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं सांगण्यात आलंय. सीरियावरील या हल्ल्यासाठी अमेरिकेच्या नौदलातील लढाऊ जहाजांना तयार राहाण्याचा आदेश दिला असून त्यांच्यावरुन सीरियावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं सोडण्यात येणार आहेत. सीरियाचे शस्त्रागार हे त्यांचे प्रमुख लक्ष्य असेल.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी मंगळवारी दमास्कसमध्ये तपासणी केल्यानंतर या नरसंहारात रासायनिक अस्त्रांचा वापर केला असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या ४२ वर्षांपासून सीरियाच्या सत्ताकेंद्राला चिकटून बसलेले अध्यक्ष बशर-अल-असाद यांच्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. त्यांच्याविरोधात देशभर बंडखोरी होत असून बंडखोरांनी बाह्य़ शक्तींच्या सहाय्यानं देशाचा सुमारे ६० टक्के भाग काबीज केलाय.


सीरियावरील ही कारवाई अपेक्षित असल्यानं अनेक देशांतील शेअर बाजारांच्या निर्देशांकांत यापूर्वीच घसरण झालीय. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमतीचे दर आकाशाला भिडले आहेत. आता सीरियावर हल्ला झाला तर या आर्थिक संकटात आणखी भर पडले, अशी भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 12:17


comments powered by Disqus