Last Updated: Sunday, November 4, 2012, 10:56
www.24taas.com, न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेले मराठमोळे ख्यातनाम गणितज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचं निधन झालंय. ते ८२ वर्षांचे होते. डॉ. श्रीराम अभ्यंकरांचा जन्म १९३० मध्ये भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला.
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील त्यांच्या निवासस्थानी ह्रदयविकाराने डॉ. अभ्यंकरांचं निधन झालं. कॉन्जेंचर ऑफ फायनाईट ग्रुप थिअरी हा महत्वाचा गणिती सिद्धांत त्यांनी मांडला होता. त्यांनी १९५१ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी, १९५२ मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठातून एम्.एस्सी, १९५५ मध्ये हॉर्वर्डमधून डॉक्टरेट पदवी घेतली.
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात गणिताचे मार्शल प्रोफेसर म्हणून ते कार्यरत होते. डॉ. अभ्यंकर म्हणजे एका मराठमोळ्या व्यक्तीमत्वानं जिद्दीच्या जोरावर उमटवलेली आंतरराष्ट्रीय झेप कौतुकास्पद आणि प्रेरणादायी म्हणावी लागेल. त्यामुळे त्यांच्या निधनानं गणिताच्या आकाशातला एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना त्यांचे चाहते व्यक्त करताहेत.
भारतातील पुणे विद्यापीठात, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडॅमेन्टल रिसर्चमध्ये आणि कोलकात्त्यात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी आमंत्रण, गणिताच्या १२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्यत्व आणि गणिताच्या ४०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रण त्यांना मिळाले होते.
First Published: Sunday, November 4, 2012, 10:56