Last Updated: Monday, February 25, 2013, 17:46
www.24taas.com, इस्लामाबाद/ नवी दिल्लीप्रेस काउंसिल ऑफ इंडिया आणि माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्युन या वर्तमान पत्रात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लेख लिहिल्यामुळे त्यांच्यावर भारतात टिकेची झोड उठली आहे. पाकिस्तानी वर्तमान पत्राच्या लेखाचं शीर्षकच ‘मोदी आणि २००२ चा नरसंहार’ असं आहे.
काटजू यांनी पाकिस्तानी वर्तमान पत्रात लिहिलेल्या लेखात गोध्रा हत्याकांडानंतर उठलेल्या दंगलीबद्दल लिहिलं आहे. या दंगलीमध्ये अल्पसंख्यांक समाजातील लोकांची जी जीवितहानी झाली, त्याबद्दल सवाल केला आहे. तसंच त्यांनी लिहिलं आहे, की २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीबद्दल कुणी बोललं, तर त्यांच्यावर हल्ला केला जातो.
काटजूंनी आपल्या लेखात असंही लिहिलं आहे की मोदींना मुस्लिम समाज पसंत करत नाही. तरीही त्यांना भारताचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सादर केलं जात आहे. यामुळे गुजराती मुसलमानांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.मोदींनी जिंकलेल्या प्रत्येक निवडणुकीचं कारण म्हणजे त्यांची मुस्लिम समाजात असलेली दहशत हे आहे. देशातील २०० दशलक्ष मुसलमान मोदींच्या विरुद्ध आहेत, असं काटजूंनी या लेखात लिहिलं आहे.
यापूर्वीही एका लेखात काटजूंनी मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. पाकिस्तानात अशा आशयाचा लेख लिहिल्यावर पुन्हा भाजपने काटजूंचा निषेध केला आहे. हा लेख राष्ट्रद्रोही असून हा लेख लिहिल्याबद्दल काटजूंवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी भाजप खासदार बलबीर पुंज यांनी केली आहे. काटजूंनी या लेखात पाकिस्तानचीच भाषा बोलली आहे, असं भाजपचं म्हणणं आहे.
First Published: Monday, February 25, 2013, 17:46