Last Updated: Friday, April 18, 2014, 17:27
www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क`नासा`ने आता पृथ्वी ग्रहाशी अगदी सारखा दिसणारा एक ग्रह शोधून काढला आहे. या ग्रहाला `केप्लर 186एफ` असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने म्हणजेच `नासा`ने या ग्रहाचा शोध लागल्याचे जाहीर केले.
हा ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे. या ग्रहाचा व्यास ८७०० मैल इतका असून हा व्यास पृथ्वीपेक्षा १० टक्क्यांनी मोठा आहे. या ग्रहाचे स्थान तो फिरत असलेल्या ताऱ्यापासून फार लांब नाही आणि फार जवळ देखील नाही. या परिस्थीतीला `गोल्डीलॉक झोन` असे म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मतानुसार `गोल्डीलॉक झोन`मुळे या ग्रहावर जीवननिर्मिती होण्याची शक्यता जास्त आहे.
याआधी `नासा`ला गेल्या वर्षी केप्लर 62 या ताऱ्याभोवती फिरत असलेले दोन गोल्डीलॉक ग्रह आढळून आले होते. मात्र त्यांचा आकार पृथ्वीच्या खूपच मोठा होता. मात्र `केप्लर 186एफ` मुळे खरचं पृथ्वीची आठवण येत असल्याची प्रतिक्रिया या संशोधन मोहिमेमध्ये काम करत असलेले शास्त्रज्ञ थॉमस एस बार्कले यांनी व्यक्त केली. `केप्लर 186एस` ही पृथ्वीची प्रतिकृती नाही, तरी देखील त्यावरील वातावरण हे जवळ जवळ पृथ्वीसारखेच असल्याचे बार्कले यांनी सांगितले. या ग्रहाच्या शोधामुळे पृथ्वी 2.0 शोधण्यातील नासाच्या मोहिमेस एक नवीन दिशा मिळेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 18, 2014, 17:27