Last Updated: Sunday, December 16, 2012, 16:59
www.24taas.com, बर्लिनजर्मनीच्या आउग्सबर्ग जिल्ह्यातील स्टटबर्ग या शहराच्या उपमहापौरपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनीता प्फाफ यांची निवड झाली आहे. अनीता या सत्तर वर्षांच्या असून त्या अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी भारताला अनेक वेळा भेट दिली आहे. मात्र नेताजींशी त्यांची भेट कधीच झाली नव्हती.
१९३४ साली नेताजी सुभाषचंद्र बोस व्हिएन्ना येथे असताना त्यांनी आपली ऑस्ट्रियन स्टेनोग्राफर एमिली शॅकल हिच्याशी विवाह केला होता. अनीता यांचा जन्म १९४२ साली झाला. त्यांच्या जन्मानंतर एका महिन्यातच नेताजी व्हिएन्ना सोडून गेले. अनीता जेमतेम अडीच वर्षांच्या असतानाच त्यांना नेताजी विमान अपघातात निधन पावल्याची बातमी मिळाली. त्यामुळे अनीता कधीच नेताजींना भेटू शकल्या नाहीत. तसंच भारतातही नेताजींच्या विवाहाबद्दल कुणाला माहिती नव्हती. बऱ्याच वर्षांनी बोस यांच्या घरी नेताजींच्या लग्नाची घटना उघड झाली होती.
वयाच्या अठराव्या वर्षी अनीता यांनी भारताला पहिल्यांदा भेट दिली होती. भारतातच त्यांची भेट ऑस्ट्रियन मार्टिन प्फाफ या सामाजिक कार्यकर्त्याशी झाली. दोघांनी मायदेशी जाऊल लग्न केलं. दोघेही अमेरिका, जर्मनी या देशांमध्ये अर्थशास्त्र विषयावर व्याख्यानं देत. तेथील विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र विषय शिकवले. समाजकार्यही चालूच ठेवलं. मार्टिन खासदार बनले आणि अनीता आता उपमहापौर बनल्या आहेत.
First Published: Sunday, December 16, 2012, 16:59