बोफोर्स घोटाळ्यातला मुख्य आरोपी क्वात्रोची याचं निधन ottavio quattrochi dies

बोफोर्स घोटाळ्यातला मुख्य आरोपी क्वात्रोची याचं निधन

बोफोर्स घोटाळ्यातला मुख्य आरोपी क्वात्रोची याचं निधन
www.24taas.com, झी मीडिया, मिलान

बोफोर्स घोटाळ्यातला मुख्य आरोपी ओट्टावियो क्वात्रोची याचं निधन झालंय.. इटलीतल्या मिलानमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं क्वात्रोचीचा मृत्यू झाल्याचं वृत्त इटालियन मीडियानं दिलंय. त्याच्या कुटुंबीयांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. तो ७२ वर्षांचा होता.

बोफोर्स घोटाळ्यातला महत्त्वाचा दुवा असलेल्या क्वात्रोचीचं हस्तांतरण करण्याचा प्रयत्न २ वेळा करण्यात आला होता. त्याच्या अटकेमुळे बोफोर्स घोटाळ्यात अनेक महत्त्वाचे खुलासे होतील, असं मानलं जात होतं. मात्र त्याच्या निधनामुळे या गाजलेल्या प्रकरणातला महत्त्वाचा दुवा आता निखळला आहे.

स्वीडनची शस्त्रकंपनी एबी बोफोर्सनं बनवलेल्या 410 बोफोर्स तोफा भारतानं 1987 मध्ये खरेदी केल्या. या व्यवहारानंतर एक वर्षानं स्वीडनच्या सरकारी रेडिओनं, बोफोर्स कंपनींन या व्यवहारासाठी 64 कोटी रुपयांची दलाली घेतल्याची बातमी दिली. त्या काळात ही खूपच मोठी रक्कम होती.

दिल्लीतील कोर्टाने 2011 मध्ये क्वात्रोचीच्या बोफोर्सच्या दलाली प्रकरणातील चौकशी बंद करण्याला मंजूरी दिली. यावर क्वात्रोची गांधी-नेहरू परिवाराचा मित्र असल्यानं सरकारनंच त्याला पाठिशी घातल्याचा आरोप झाला. पण कोर्टात मात्र ही बाब कधीही सिद्ध होऊ शकली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 13, 2013, 23:46


comments powered by Disqus