पाकमध्ये राम मंदिर पाडले, हिंदू संतप्त!, Pak Hindus protest destruction of century-old temple in Karachi

पाकमध्ये राम मंदिर पाडले, हिंदू संतप्त!

पाकमध्ये राम मंदिर पाडले, हिंदू संतप्त!

www.24taas.com, कराची

कराचीतील हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं प्राचीन श्रीराम पीर मंदिर एका बिल्डरने कुठल्याही परवानगीशिवाय जबरदस्तीनं पाडल्यानं हिंदू भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. १०० वर्षं जुनं आणि फाळणीच्या आधीपासून कराचीतील सोल्जर बाजारात उभ्या असलेल्या या मंदिराचा विषय कोर्टात प्रलंबित होता. पण, या प्रकरणाचा निकाल येण्याआधीच बिल्डरनं मंदिर तोडून टाकलं आणि आजूबाजूची ४० घरंही पाडली. त्यापैकी बहुसंख्य घरं हिंदूंची होती.

पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराचे हे ताजं उदाहरण घडलं आहे. कोणत्याही कायद्याला न जुमानता बिल्डरनं हे मंदिर पाडलं आणि प्रशासनानंही त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. या प्रकारामुळे पाकिस्तानातील हिंदूधर्मीय चांगलेच खवळलेत.

कराचीतील प्राचीन राम पीर मंदिर पाडण्यास स्थगिती देण्याबाबत सिंध हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. पण त्यावर सुनावणी सुरू असतानाच, शनिवारी स्थानिक बिल्डर मोठा फौजफाटा घेऊन सोल्जर बाजार परिसरात आला आणि त्यानं हे मंदिर जमीनदोस्त करून टाकलं. या दादागिरीचा निषेध करण्यासाठी पाकिस्तान हिंदू काउन्सिलनं आज कराचीच्या प्रेस क्लबबाहेर जोरदार निदर्शनं केली. या निदर्शकांमध्ये भाविकांसोबतच, बेघर झालेली हिंदू कुटुंबही होती. त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या.

First Published: Monday, December 3, 2012, 19:19


comments powered by Disqus