Last Updated: Thursday, November 28, 2013, 15:31
www.24taas.com, वृत्तसंस्था,इस्लामाबादमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० कसोटी सामने खेळल्यानंतर निवृत्त झाला. सचिनने २४ वर्षे क्रिकेटची सेवा केल्याने जगात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर अधिकच कौतुकाची भर पडत आहे. सचिनचे कौतुक करण्यात पाकिस्तान मीडिया मागे नाही. मात्र, हे कौतुक तालिबानला खुपले आहे. आता सचिनचे कौतुक नको. तो भारतीय आहे. नाहीतर तुम्हाला टार्गेट करू, अशी धमकी तालिबान्यांनी दिली आहे.
सचिन तेंडुलकर तालिबानच्या ‘हिट’लिस्टवर आला आहे. तेंडुलकरचे पाकिस्तानात कौतुक बस्स झाले. सचिन हा भारतीय हे लक्षात ठेवा. तेव्हा आता त्याचे कौतुक पुरे. यापुढे त्याचे कौतुक होता कामा नये. कौतुकाचे बोल दिसले तर तुमच्यावर हल्ला केला जाईल, असा गंभीर इशारा पाकिस्तान मीडियाला तालिबानने दिलाय.
तालिबान नेत्यांना शिक्षणाचे वावडे आहे. मात्र, सचिनवर पाकिस्तान मीडियाने कौतुकाचा वर्षावर केल्यानंतर ते वृत्तपत्र वाचतात, हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरचे जे कौतुक होत आहे ते पाहून या तालिबान्यांनी समस्त पाकिस्तानी मीडियाला जान से मारने की धमकी दिली आहे.
सचिनचे कौतुक पुरे करा. त्याचबरोबर पाकिस्तानचा कॅप्टन मिसबाह उल हक याच्यावरील टीकाही थांबवा, कारण तो पाकिस्तानी आहे, अशी धमकीची व्हिडीओ क्लिप तालिबान्यांनी मीडियाला पाठवली आहे. ही क्लिप फेसबुकवरही अपलोड करण्यात आली आहे. सचिन निवृत्त झाल्यानंतर जगभरातील मीडियाने त्याच्या झंझावाती कारकीर्दीचा आढावा घेताना त्याचे भरभरून कौतुक केले. पाकिस्तानातील डॉन, एक्स्प्रेस ट्रिब्यून, डेली टाइम्स या इंग्रजी वर्तमानपत्रांसह उर्दू दैनिके आणि वृत्तवाहिन्यांनी सचिनचे कौतुक करताना आपले शब्द आखडते घेतले नाहीत.
१९४७च्या फाळणीनंतर भारतीय माणसाचे पाकिस्तानी मीडियाने कौतुक करण्याची ही पहिलीच घटना. त्यामुळेच तालिबानी चांगलेच खवळले आहेत. बुरखा घातलेले, हातात एके-४७ घेतलेले दोन तालिबानी धमकी देत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून आम्ही पाहतोय, पाकिस्तानी मीडिया सचिन तेंडुलकरचे जास्तच कौतुक करतेय. तेंडुलकरवर वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून लिहिले जातेय.
दुसर्या बाजूला पाकिस्तान संघाचा कॅप्टन मिसबाह उल हक आणि पाकिस्तानी टीमवर मीडिया जोरदार टीका करते आहे. हे खरोखरच वाईट आणि दुर्दैवी आहे. सचिन तेंडुलकर हा उत्तम क्रिकेटपटू आहे हे खरे; मात्र, तो भारतीय आहे हे लक्षात ठेवा, दम तालिबानने दिलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 28, 2013, 07:41