Last Updated: Monday, May 12, 2014, 09:46
www.24taas.com, झी मीडिया, ढाका निर्वासित बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्तन गाठीची समस्या उद्भवल्यानं न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
तस्लिमा नसरीन या सर्दी खोकल्यावर इलाजासाठी हॉस्पीटलमध्ये गेल्या होत्या. परंतु, इथं त्यांना त्यांच्या ब्रेस्ट ट्युमर असल्याचं समजलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या स्तनाची गाठी खूप मोठी आहे आणि त्याचा धोका समजून घेण्यासाठी ताबडतोब त्यांची बायप्सी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘बीडी न्यूज 24 डॉट कॉम’नं दिलेल्या माहितीनुसार, बॉयप्सीचा रिपोर्ट उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
या आजाराची माहिती मिळाल्यानंतर 51 वर्षीय तस्लिमा खूपच चिंतेत आहेत. याचं एक कारण म्हणजे त्यांच्या आईचाही मृत्यू कॅन्सरमुळेच झाला होता. तर त्यांच्या एका भावावर न्यूयॉर्कमधल्याच एका हॉस्पीटलमध्ये कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. पण, बायप्सीनंतर लगेचच न्यूयॉर्कमध्ये आपण एका हॉटेलमध्ये हैदराबादी बिर्याणी खाल्याचं तस्लिमा यांनी एका ट्विटमध्ये सांगतिलंय.
प्रिय भारत, जर मला उद्या स्तन कॅन्सर असल्याचं माहित झालं णि जर मी या जगाचा निरोप घेतला तर माझ्या प्रिय मांजरीची मीनूची काळजी घ्या. ती जगातली सर्वात चांगली मांजर आहे, असं तस्लिमा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
व्यावसायानं डॉक्टर असलेल्या तस्लिमा यांची ‘लज्जा’ ही कादंबरी आल्यानंतर त्यांना अनेक कट्टरपंथियांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यानंतर 1998मध्ये त्यांना बांग्लादेश सोडावा लागला. तेव्हापासून त्या भारत आणि इतर पश्चिमी देशांत राहत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 09:46