छोटा शकील, मेमनला अमेरिकेत बंदी - Marathi News 24taas.com

छोटा शकील, मेमनला अमेरिकेत बंदी

www.24taas.com,वॉशिंग्टन
 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन या दोघांवर अमेरिकेची बंदी घालण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळं अमेरिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्या कारवाया वाढल्या असून याला आळा घालण्यासाठी अमेरिकेनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंडरवर्ल्डच्या कारवायांना आळा बसण्याची शक्यता अधिक आहे.  छोटा शकील आणि टायगर मेमन अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यापार करीत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळं ही बंदी लादण्यात आलीआहे.
 
मुंबईत जन्मलेला ५७वर्षांचा छोटा शकील हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा उजवा हात असल्याचे मानले जाते. त्याच्यावर दाऊदच्या डी कंपनीचा अन्य गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवादी संघटनांबरोबर व्यवहार करण्याची जबाबदारी आहे. मेननदेखील दाऊदचा अतिशय जवळचा साथीदार आहे. तो दक्षिण आशियात डी कंपनीचे उद्योगधंदे सांभाळतो. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणी भारत छोटा शकील आणि मेनन यांचा शोध घेत असल्याचे समजते.
 
बंदीमुळं दाऊद आणि त्यांच्या साथीदारांना अमेरिकेत आर्थिक व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आलाय. दाऊद आणि त्याच्या साथीदारांनी अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं अमेरिका आणि लॅटीन अमेरिकी देशांपर्यंत पोहचवलयं. अमेरिकेनं दाऊदच्या साथीदारांवर बंदी घालून त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे.

First Published: Wednesday, May 16, 2012, 11:49


comments powered by Disqus