सिरियातील हिंसाचार थांबवा - संयुक्त राष्ट्रे - Marathi News 24taas.com

सिरियातील हिंसाचार थांबवा - संयुक्त राष्ट्रे

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
सिरियामध्ये एका गावात झालेल्या ९२ नागरिकांच्या हत्याकांडाचा संयुक्त राष्ट्रांनी तीव्र निषेध केला. सिरियातील वाढता हिंसाचार थांबविण्याचे आवाहन करताना मानवतेला काळिमा फासणा-या अशा नरसंहाराला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांनी केले आहे.
 
सिरियामधील संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख मोहिमेतील (यूएनएसएमआयएस) निरीक्षकांनी हुला या गावात या हत्याकांडातील बळींचे मृतदेह पाहिल्यानंतर या भयंकर हत्याकांडाची पुष्टी केली आहे. या हत्याकांडात ठार झालेल्यांमध्ये ३२ बालकांचा समावेश आहे. त्याचबरोबर जवळच असलेल्या नागरी वस्तीवर रणगाडे व बंदुकांच्या साहाय्याने हल्ला झाल्याचे पुरावे मिळाले असल्याचेही सांगितले आहे.
 
सिरियाच्या सरकारने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग केला आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून आणि सिरिया समस्येबाबत स्थापन केलेली अरब देशांची संघटना आणि संयुक्त राष्ट्रांचे विशेष राजदूत कोफी अन्नान यांच्यावतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त सिरिया सरकारने नागरी वस्त्यांवर अवजड शस्त्रांच्या साहाय्याने केले जाणारे हल्ले ताबडतोब थांबवावे, अशी मागणी बान की मून, कोफी अन्नान आणि मूड या तिघांनी केली आहे.
 
सिरियामधील संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख मोहिमेचे प्रमुख रॉबर्ट मूड यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार या मोहिमेतील निरीक्षकांनी स्वत: या मृतदेहांची मोजणी केली. यात  दहा वर्षांच्या आतील मुलांचे ३२ तर प्रौढांचे ६० मृतदेह सापडले.
 

First Published: Monday, May 28, 2012, 13:29


comments powered by Disqus