भरारी 'सोलर इम्पल्स'ची... - Marathi News 24taas.com

भरारी 'सोलर इम्पल्स'ची...

www.24taas.com, मोरोक्को
 
पारंपरिक विमानांपुढं आता सौर विमानाचं आव्हान निर्माण झालंय. इंधनाशिवाय केवळ सौर ऊर्जेवर १९ तास उड्डाण करण्याचा रेकॉर्ड ‘सोलर इम्पल्स’ या विमानानं केलाय. २७ हजार फूट उंचावर, ढगांच्या आड तेही पेट्रोलशिवाय...
 
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या ‘सोलर इंपल्स’ विमानानं इंधनाशिवाय सगळ्यात जास्त अंतर पार केलंय. एका वेळी ८३० किलोमीटरचा पल्ला या विमानानं ओलांडलाय. या सर्व प्रवासात एक थेंब इंधनाचा वापर करण्यात आलेला नाही. मॅड्रिडमधून टेक ऑफ करताच रात्रीच्या वेळी हे विमान कसं चालणार, याबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र, पायलट ‘बर्टेनर्ड पिकार्ड’ याला विमानाबाबत पूर्ण विश्वास होता आणि झालंही तसंच. टेक ऑफ करताच सौरऊर्जेवर चालणाऱ्या विमानानं नवी भरारी घेतली. सूर्यास्तानंतरच्या कठिणसमयीसुद्धा विमान ताशी ७० किलोमीटर वेगानं पुढं जात होतं. सोसाट्याच्या वाऱ्याचा जिब्राल्टरच्या खाडीचा प्रदेश असो किंवा शून्य ते २९ डिग्री अंश सेल्सियस वातावरणातली कडाक्याची थंडी, अडथळ्यांची शर्यत पार करत असतानाही सोलर इंपल्स विमान पुढं जातंच होतं. १९ तास न थांबता अखेर हे सौर विमान मोरक्कोची राजधानी रबात इथं पोहचलं. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि विमानाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
 
सौरऊर्जेवर चालणाऱ्या अनेक गोष्टी जगानं पाहिल्यात. त्यात आता या ‘सौर इंम्पल्स’ विमानाची भर पडलीय. सगळ्यात जास्त अंतर कापण्याचाही रेकॉर्ड या विमानानं केलाय. लवकरच हे सौर विमान जगाची सफर करणार असल्याचा विश्वास विमानाच्या कंपनीनं केलाय. त्यामुळं पारंपरिक विमानापुढं मोठं आव्हान निर्माण होणार आहे.
 
.
 

First Published: Friday, June 8, 2012, 22:36


comments powered by Disqus