इजिप्तचे माजी राष्ट्रपती मुबारक 'कोमा'त - Marathi News 24taas.com

इजिप्तचे माजी राष्ट्रपती मुबारक 'कोमा'त

 www.24taas.com, काहिरा
 
इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक हे 'कोमा'त गेले आहेत. त्यांना एका कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर ठेवण्यात आलंय. यूरा जेलच्या जवळच असलेल्या माजी सैन्य हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
 
इ़जिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. होस्नी मुबारक यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. जानेवारीत इजिप्तमधील क्रांतीच्या काळात हत्याकांड, सरकारी निधीचा गैरवापर असे अनेक आरोप मुबारक यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर होते. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, 84 वर्षीय मुबारक यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर ठेवण्यात आलं असलं तरी त्यांचं ह्रदयानं मात्र उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलंय. त्यांची प्रकृति खालावल्यामुळे जेल अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना पाचारण केलं. शरिरातील रक्तप्रवाह थांबल्यामुळे त्यांच्यावर औषधोपचारही सुरू झाले होते.
 
पण, होस्नी मुबारक यांना जेलबाहेर आणण्यात मात्र धोका असल्याचं सरकारला वाटतंय. यामुळे सामान्य लोकांचा राग उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. माजी राष्ट्रपती मुबारक यांच्याविषयी सुरक्षा आणि सैन्य अधिकाऱ्यांना अजूनही पुळका असल्याची भावना लोकांच्या मनात आहे. आणि म्हणूनच मुबारक यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलंय.
 
 

First Published: Wednesday, June 20, 2012, 11:58


comments powered by Disqus