Last Updated: Thursday, June 28, 2012, 12:49
www.24taas.com, लाहोर अखेर पाकिस्तानच्या जेलमधून सुरजित सिंग यांची सुटका झाली आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर सुरजित सिंग यांनी मायभूमीत पाऊल ठेवलंय. वाघा बॉर्डरवर सुरजित सिंगांच्या स्वागतासाठी कुटुंबियांसह मित्रपरिवारांनी गर्दी केली होती.
६९ वर्षीय सुरजित सिंग सुटकेनंतर भावूक झाले होते. कैद्यांची सुटका करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी पुढाकार घ्यावा, अशी भावना सुरजित सिंग यांनी यावेळी व्यक्त केली. जेलमधून सुटकेनंतर पाकिस्तान सरकारचे आभार मानले. मात्र, यापुढे पाकिस्तानमध्ये परत जाण्याची इच्छा नाही, अशी प्रतिक्रिया सुरजित सिंग यांनी व्यक्त केली. १९८० मध्ये सुरजित सिंग यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. लाहोरमधल्या कोट लखपत जेलमधून त्यांची सुटका करण्यात आलीय. सुरजित सिंग आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आतूर झाले होते. आज माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा क्षण असल्याची भावना सुरजित यांनी व्यक्त केलीये. तसंच सुवर्ण मंदिरात जाऊन प्रार्थना करणार असल्याचंही सुरजित म्हणाले.
पाकिस्तान जेलमधून सुरजित यांची सुटका झाली पण, सरबजितसिंगांची सुटका कधी होणार असा सवाल सरबजितसिंगांच्या कुटुंबियांनी केलाय. सरबजितसिंगांच्या सुटकेसाठी हातात बॅनर घेऊन त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली.
.
First Published: Thursday, June 28, 2012, 12:49