कॅम्बोडियात अज्ञात आजारानं घेतले 61 बळी - Marathi News 24taas.com

कॅम्बोडियात अज्ञात आजारानं घेतले 61 बळी

www.24taas.com, कॅम्बोडिया
 
इंडो-चायनाच्या पश्चिम भागातील कॅम्बोडिया या देशात एका अज्ञात आजारानं एकच खळबळ उडालीय. या अज्ञात आजारामुळे आत्तापर्यंत 61 मुलांना आपला जीव गमवावा लागलाय, अशी माहिती जागतिक आरोग्य विभागानं (WHO) नं दिलीय. शहरात धुमाकूळ घालणाऱ्या अज्ञात आजार शोधून काढण्याचं आव्हान आता कॅम्बोडियाच्या आरोग्य विभागावर आहे.
 
एप्रिलपासून आत्तापर्यंत गूढ बनून राहिलेल्या या आजारानं हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या 62 पैकी 61 मुलं दगावली आहेत. पण, जागतिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, हा संसर्गजन्य रोग असल्याची अजून तरी काहीही लक्षणं दिसून आलेली नाही. त्यामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा रोग कसा पोहचतोय, यावर तज्ज्ञांचा शोध सुरू आहे. आत्तापर्यंतचे सर्व बळी एकाच रोगामुळे गेलेत की वेगवेगळ्या आजारानं, हे शोधून काढण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
 
या अज्ञात आजारामुळे 10 वर्षांखालील मुलांना धोका निर्माण झालाय. या आजारात सुरुवातीला ताप चढतो. अल्पावधीतच त्याचा परिणाम शरिरावर आणि श्वसनप्रक्रियेवर जाणवतो. दक्षिण कॅम्बोडियातील 14 प्रांतातील वेगवेगल्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण भर्ती आहेत. कॅम्बोडियाचे आरोग्य मंत्री मॅन बंग हेंग यांच्या म्हणण्यानुसार या आजाराची कारणं शोधून काढण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे त्यांनी शेजारच्या साऱ्या देशांना सावधानतेचा इशारा दिलाय.

First Published: Thursday, July 5, 2012, 15:28


comments powered by Disqus