Last Updated: Tuesday, July 10, 2012, 17:19
www.24taas.com, इस्लामाबाद लष्कर-ए-तोएबाचा सरदार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात दडून बसल्याची माहिती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना होती. हा खळबळजनक दावा भारत किंवा अमेरिकेकडून झाला नसून चक्क पाकिस्तानाच्या आयएसआयच्या माजी प्रमुखाने केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या एका ब्रिगेडियरनेच लादेनला आश्रय दिला होता, अशी माहितीही त्याने दिली.
एजाज शाह असे या ब्रिगेडियरचे नाव असून एजाज हे मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचा दावा आयएसआयचे माजी प्रमुख जनरल झियाउद्दीन बट यांनी केला आहे. एक वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना बट यांनी हा दावा केला. एजाजनेच लादेनला अबोटाबादमध्ये प्रशस्त घरात लपवले असे मला वाटते, असे बट म्हणाल्याचे वृत्त सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड या वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे.
एजाज हे मुशर्रफ यांच्या काळात गुप्तहेर यंत्रणेच्या प्रमुखपदावर होते. एजाज यांचे गुन्हेगारी विश्वाशी वर्षानुवर्षांचे संबंध होते. त्याचबरोबर लष्करालाही ते जवळून ओळखत होते, असा दावा बट यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 2 मे रोजी अबोटाबाद येथील घरावर कारवाई झाली होती. या घराला कुंपण बांधण्याचे आदेशदेखील एजाज यांनी दिले होते. एजाज यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. दुसरीकडे बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर एजाज यांनी पाकिस्तान सोडून ऑस्ट्रेलिया गाठले.
First Published: Tuesday, July 10, 2012, 17:19