सुनीता विल्यम्सची दुसऱ्यांदा अंतराळात झेप - Marathi News 24taas.com

सुनीता विल्यम्सची दुसऱ्यांदा अंतराळात झेप

www.24taas.com, बैकोनूर 
 
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स दोन सहकाऱ्यांसह अंतराळात झेप घेतली आहे. अमेरिकेची नागरिक असलेली सुनीता दुसऱ्यांदा अंतराळात झेपावली आहे.
 
कझाकिस्तानातील बैकोनूर तळावरून तीने आज रविवारी सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अंतराळात उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहा महिने राहण्याचा विक्रम सुनीताने २००६ मध्ये केला होता. तीने पुन्हा दोन सहकाऱ्यांसह उड्डाण केले. रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीचा फ्लाइट इंजिनिअर युरी मालचेन्को आणि जपान एरोस्पेस एक्‍सप्लोरेशनचा अकिहिको होशिडे हे अंतराळवीर सुनीताचे सहकारी आहेत, अशी माहिती 'नासा'तर्फे देण्यात आली.
 
'सोयूझ टीएमए-०५ एम' या अंतराळ यानातून तिघांनी उड्डाण केले. मंगळवारी ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोचतील. त्यांचे यान स्थानकाला जोडले जाईल. सध्या या स्थानकात काही अंतराळवीर मुक्कामाला आहेत. सुनीता आणि तिच्या सहकाऱ्यांचा अवकाश स्थानकातील कार्यक्रम भरगच्च आहे. त्यात अवकाश स्थानकात वस्तू घेऊन येणाऱ्या यानांची स्थानकाला जोडणी करणे, दोन स्पेस वॉक आणि अनेक शास्त्रीय प्रयोगांचा समावेश आहे.
 
अवकाश स्थानकातील अंतराळवीरांसाठी जपान, अमेरिका आणि रशियाची याने अनेक वस्तू आणणार आहेत.  भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सुनीताला या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
व्हिडिओ पाहा..
 

 
फोटो पाहा..
 
अंतराळभरारी करणारी सुनीता विल्यम्स

First Published: Sunday, July 15, 2012, 12:44


comments powered by Disqus