Last Updated: Friday, July 27, 2012, 23:40
www.24taas.com, लंडन पुण्यातील विद्यार्थी अनुज बिडवे याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी ब्रिटिश विद्यार्थी कियारन स्टेपलटन याला न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कियारनला काल न्यायालयाने दोषी ठरवले होते.
शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या अनुजचा गेल्यावर्षी २६ डिसेंबरला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी स्टेपलटन याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मीच अनुजच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, अशी कबुली स्टेपलटनने न्यायाधीशांपुढे दिली होती. मात्र, अनुजचा खून केल्याचा आरोप त्याने फेटाळला होता.
ख्रिसमस साजरा करण्यासाठी अनुजसह लॅकेस्टर विद्यापीठातच शिकणारे त्याचे भारतीय मित्र मॅंचेस्टर येथे गेले होते. त्यानंतर तेथून परतताना निर्मनुष्य भागामध्ये दोन विद्यार्थी या तरुणाजवळ आले. त्यांच्यातील एकाने आपल्या पिस्तूलातून अनुजच्या डोक्यात गोळीबार केला होता. त्यामध्ये अनुजचा मृत्यू झाला. अनुजच्या मारेकऱयाची माहिती देणाऱयास ५० हजार पौंडाचे बक्षिसही ब्रिटिश पोलिसांनी जाहीर केले होते.
First Published: Friday, July 27, 2012, 23:40