पाकला भारतात थेट गुंतवणुकीची परवानगी - Marathi News 24taas.com

पाकला भारतात थेट गुंतवणुकीची परवानगी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भारत सरकारने पाकिस्तानाला भारतीय व्यापारात गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत आणि पाकिस्तानाकडून भारताला सर्वांत प्रिय राष्ट्र (MFN) दर्जा मिळावा, या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
 
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याब्ददल सांगण्यात आलं आहे. आर्थिक धोरणांचा अभ्यास करून असा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानली आता भारतातील रजिस्टर्ड कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र संरक्षण क्षेत्राशी संबंधित संस्थांमध्ये पाकिस्तान गुंतवणूक करू शकत नाही. संरक्षण क्षेत्र,अणू ऊर्जा प्रकल्प, अवकाश संशोधन यांसारख्या क्षेत्रांपासून पाकिस्तानी गुंतवणूकदारांना दूर ठेवण्यात आलं आहे.
 
पाकिस्तानी गुंतवणूकदार सिमेंट, कापड, क्रीडा इत्यादी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतात. “पाकिस्ताननेही आता भारतीय गुंतवणूकदारांना पाकिस्तानी कंपन्यांमध्ये गुंतवणूकीची संधी दिली पाहिजे.” असं CIIचे संचालक चंद्रजीत बॅनर्जी यांचं म्हणणं आहे. तर “या निर्णयामुळे दोन्ही देशातील विश्वास वाढीस लागेल”, असा विश्वास सार्कचे अध्यक्ष विक्रमजीत सिंग साहनी यांनी व्यक्त केला आहे. “भारताने एवढा मोठा निर्णय घेतल्यावर आता पाकिस्तानने भारताला ‘सर्वांत प्रिय राष्ट्रा’चा दर्जा द्यावा”, असं FICCI सचिन राजीव कुमार म्हणाले आहेत.

First Published: Thursday, August 2, 2012, 08:34


comments powered by Disqus