तालिबान अतिरेक्यांचे पाक सैनिक टार्गेट - Marathi News 24taas.com

तालिबान अतिरेक्यांचे पाक सैनिक टार्गेट

झी २४ तास वेब टीम, इस्लामाबाद 
 
तालिबानी अतिरेक्यांनी पुन्हा पाकिस्तान सैन्याला लक्ष्य केले आहे. आदिवासीबहुल प्रांतातील सुरक्षा दल ठाण्यावर जोरदार हल्ला केला. एवढ्यावर न थांबता काही पाकच्या सैनिकांचे अपहरण केले आहे.
 
या अपहरणाला अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही. सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली असली तरी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची आणि अपहरणाची जबाबदारी स्वीकारली नसली तरी तहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचेच हे कृत्य असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
पाकिस्तानच्या आदिवासीबहुल प्रांतातील सुरक्षा दलाच्या ठाण्यांवर तालिबानी अतिरेक्यांनी  हल्ले चढवित अनेक सैनिकांला टार्गेट केले आहे.  खैबर पख्तूनवाला प्रांतातील हल्ल्यात दोन सैनिक जखमीही झाले आहेत. दक्षिण वझिरिस्तानाजवळील मुलझई भागात प्रांतिक दलाच्या तळांवर अतिरेक्यांनी हल्ला चढवून अनेक सैनिकांचे अपहरण केल्याचे एक्स्प्रेस दूरचित्रवाहिनीने म्हटले आहे.
 

पाकिस्तानी लष्कराने २००९ साली व्यापक मोहीमेद्वारे दक्षिण वझिरिस्तानच्या मुलखातून तालिबानी अतिरेक्यांचा नायनाट केला आहे. असे असले तरी दुर्गम डोंगराळ भागांत या अतिरेक्यांनी मोठय़ा प्रमाणात आश्रय घेतला आहे. पाकिस्तान सरकार तालिबानी अतिरेक्यांशी चर्चा करीत असल्याचे वृत्त असतानाच हे हल्ले झाले आहेत.
 
दरम्यान,  नाटो सैन्याच्या हवाई हल्ल्यात २४ पाकिस्तानी ठार झाल्यावरून अमेरिका-नाटो दल आणि पाकिस्तानातील संबंध अद्याप ताणलेलेच आहेत. या हल्ल्याबद्दल माफी मागावी, ही पाकिस्तानची मागणी अमेरिकेने स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली.
 
अमेरिका आणि नाटोच्या चौकशी समितीने या हल्ल्याबाबत जे निष्कर्ष काढल्याचे आम्ही प्रसिद्धी माध्यमांतून ऐकले आहे ते निष्कर्ष अपुरे आहेत. त्यामुळे या चौकशीला आमची मान्यता नाही. चौकशीचा अहवाल पाहिल्यानंतरच अधिकृत प्रतिक्रिया आम्ही देऊ, असे पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे प्रवक्ते मेजर जनरल अत्तार अब्बास यांनी स्पष्ट केले आहे.
 
वॉशिंग्टनमध्ये हा अहवाल जारी करताना अमेरिकन संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकन सैनिकांनी आत्मरक्षणार्थ हा हल्ला केला होता. मात्र गैरसमजातूनच तो झाला असून ती आमची चूक होती हे आम्ही मान्य करतो.
 
 

First Published: Saturday, December 24, 2011, 10:15


comments powered by Disqus