अनुजला न्याय मिळणार का? - Marathi News 24taas.com

अनुजला न्याय मिळणार का?

झी २४ तास वेब टीम, लंडन

ब्रिटनमध्ये हत्या झालेल्या पुण्याच्या अनुजचा मृतदेह मिळायला आणखी दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्याचे मित्र सोशल साईटसवरुन सक्रीय झाले आहेत. दुसरं म्हणजे अनुजच्या हत्येमुळे परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
 
ब्रिटनच्या लँकस्टर विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या अनुजची हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला. अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. ब्रिटीश पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र हा तपास पूर्ण होईपर्यंत अनुजचा मृतदेह भारतात पाठवण्यात येणार नाही. ब्रिटनमध्ये सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे अनुजच्या मृतदेहाचं विच्छेदन आणि तपासाला वेळ लागतो आहे. या पार्श्वभूमीवर अनुजच्या मित्रांनी जस्टिस फॉर अनुज आणि हेल्प फॉर अनुज नावाची दोन पेजेस फेसबुकवर उघडली आहेत. अनुजच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त करतानाच त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा, यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला होण्याच्या घटना यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. आता अनुजचा बळी गेल्यावर परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षानं समोर आला आहे. अनुजच्या हत्या प्रकरणात ब्रिटीश प्रशासन आणि भारतीय वकिलातीकडून सुरुवातीला काहीच सहकार्य मिळालं नाही. आता ही घटना जगभर पोहोचल्यानंतर वेगानं हालचाली सुरू झाल्या आहेत. अनुजचे वडील आणि मेव्हणे लवकरच त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ब्रिटनला रवाना होणार आहेत. त्यांना योग्य ती मदत मिळण्याबरोबरच दोषींना कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे.

First Published: Thursday, December 29, 2011, 19:20


comments powered by Disqus