स्टीव्ह जॉब्सच्या व्यक्तीमत्त्वाची दुसरी बाजू - Marathi News 24taas.com

स्टीव्ह जॉब्सच्या व्यक्तीमत्त्वाची दुसरी बाजू

झी २४ तास वेब टीम,
 
मंदार मुकुंद पुरकर
 
स्टीव्ह जॉब्सच्या निधनानंतर जगभरात शोक व्यक्त केला गेली. आजवर कोणत्याही उद्योजकाच्या निधनानंतर जागतिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नसतील. अर्थात जॉब्सचं कर्तृत्व आभाळा एवढं होतं हे निर्विवाद सत्य आहे. जॉब्स विलक्षण प्रतिभाशाली, मूर्तीभंजक, निर्मितीक्षम, सृजनशील व्यक्तीमत्व होतं. ऍपलचा निर्माता असलेल्या जॉब्सविषयी जगभरात आदराची भावना होती. पण जॉब्स एक व्यक्ती म्हणून चांगला माणूस होता काय?
 
आपणा सर्वांना माहितीच आहे की जॉब्सला दत्तक घेण्यात आलं होतं. स्टानफोर्ड विद्यापीठात त्याने २००५ साली केलेल्या भाषणात त्यासंबंधी त्याने उल्लेख केला होता. पण हे फार कमी लोकांना ठाऊक आहे की १९७७ साली त्याच्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असलेली त्याची मैत्रिण ख्रिस अँन ब्रेनान गर्भवती राहिल्यानंतर त्याने त्याचे पितृत्व स्वीकारायला नकार दिला होता. आणि एवढेच नव्हे तर त्याने गर्भपात करण्याविषयी तिला बजावलं होतं. ख्रिसने नकार दिल्यानंतर जॉब्सने तिच्याशी संबंध तोडले. ख्रिसने लिसा निकोलला जन्म दिल्यानंतर डीएनए टेस्टने जॉब्स तिचा पिता असल्याचं सिध्द झाल्यानंतरही त्याने मुलाच्या संगोपनाचा खर्च द्यायला नकार दिला. अखेरीस न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर नाईलाजाने त्याने पैसे दिले.
 

जॉब्सची मित्रांशी असलेली वागणूक विचित्र, बेभरवशाची आणि स्वार्थी स्वभावाचेच दर्शन घडवणारी होती. या संदर्भात जॉब्सने एल्वी रे स्मिथशी केलेली वर्तणुक हे एक उत्तम उदाहरण आहे. जॉब्सची १९८५ साली ऍपलमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्याने पिक्सार ही कॉम्प्युटर अँनिमेशन कंपनी विकत घेतली. एल्वी रे स्मिथ हा पिक्सारचा सहसंस्थापक होता. स्मिथ आणि त्याच्या टीमने कॉम्प्युटर अँनिमेशन मध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणले आणि त्यामुळेच जॉब्सने आयुष्यात पहिल्यांदी बिलियन डॉलर्सची कमाई केली.
 
जॉब्स आणि स्मिथने अनेक वर्षे एकत्र काम केल्यानंतर एका मिटिंगच्या दरम्यान जॉब्सने स्मिथवर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवला. त्याला निमित्त होतं स्मिथने व्हाईट बोर्ड चा वापर केल्याचं. जॉब्सकडे जणुकाही व्हाईट बोर्ड वापरण्याचे मालकीहक्क होते आणि हा नियम कोणीही तोडण्याची प्राज्ञा नव्हती. स्मिथ जॉब्सच्या अपमानास्पद वागणुकीमुळे पिक्सारमधून बाहेर पडला आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने उभारलेल्या साम्राज्यावर त्याने पाणी सोडलं. जॉब्सने हे कमी कि काय म्हणून पिक्सारच्या इतिहासातून स्मिथचा नामोल्लेखच काढून टाकला जणु स्मिथने कंपनीच्या उभारणीत काहीच योगदान दिले नव्हते.
 
आर्थिक आरिष्टात सापडलेल्या ऍपलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी गिल अमेलियोची नियुक्ती १९९६ साली करण्यात आली आणि कंपनीच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी त्याला तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला. अमेलियोने जॉब्सला विशेष सल्लागार म्हणून नेमलं. जॉब्सने नेमणुक झाल्यानंतर ताबडतोब अमेलियोच्या विरोधात एका आघाडीच्या मासिकात स्टोरी छापून आणली आणि जॉब्सच्या हाती कंपनीची सूत्रे देण्याची वेळ आली आहे असं त्यात भाष्य करण्यात आलं. त्यानंतर जॉब्सने बोर्डरुममध्ये डावपेच लढवत आणि अमेलियोची हकालपट्टी केली.
 
ऍपलने अमेलियोशी केलेला तीन वर्षांचा करारनामा मोडला आणि त्याने अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत तीन बिलियन डॉलर्सचा राखीव निधी उभारला याकडे दुर्लक्ष केलं. जॉब्सला एवढ्या मोठ्या भांडवलाच्या आधारे कंपनीच्या भविष्याचे नियोजन करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. जॉब्सने मात्र आपण एका डबघाईला आलेल्या कंपनीची सूत्रं हाती घेत असल्याचं जगाला भासवलं. त्यानंतरचा इतिहास सर्वांना ज्ञात आहेत आयमॅक, आयपॉड, आयफोन आणि आयपॅड या एकाहून एक सरस अशा उत्पादनांची मालिकाच जॉब्सने निर्माण केली. पण एकीकेड थिंक डिफरंट कूल असं सांगणाऱ्या ऍपलने व्यवसायात भयानक डावपेच लढवत प्रतिस्पर्ध्यांना गारद केलं. सी अँड जी या कंपनीने तयार केलेल्या साऊंडजॅम या एमपी थ्री सॉफ्टवेअरचे हक्क जॉब्सने विकत घेतले आणि त्यानंतर त्या कंपनीतल्या उत्कृष्ट डेव्हलपर्सना आपल्या कडे ओढलं. सी अँड जी कंपनीला गाशा गुंडाळण्याची पाळी जॉब्समुळे ओढावली. जॉब्सने १९९४ साली दिलेल्या एका मुलाखतीत याच हुशारीने समर्थन केलं होतं.
 
ऍपलने कर्मचाऱ्यांना दिलेल्या स्टॉक ऑपशन मध्ये घोटाळा केल्याचे २००६ साली उघडकीस आलं. त्याविरोधात स्टॉकहोल्डर्सनी खटला दाखला केला तेंव्हा या सर्व प्रकारची जॉब्सला कल्पना होती हे देखील सिध्द झालं. जॉब्स आणि १२ जणांनी १४ मिलियन डॉलर्स देऊन अखेरीस प्रकरण मिटवलं.
 
ऍपलचे जवळपास सर्व उत्पादन चीनमधून आऊटसोर्स केलं जात आणि तिथे कामगारांना अमानवी परिस्थितीत काम कराव लागत असल्याचे आरोप वारंवार झाले आहेत. त्यामुळे काही कामगारांनी आत्महत्याही केल्या आहेत. पर्यावरण संदर्भात कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. या बाबतीत बिजिंगमधल्या एका संस्थेने कंपनी कोणत्याही प्रकारे दाद देत नाही आणि पर्यावरणाशी संबंधीत मुद्दांबाबत जबाबदारी स्वीकारण्यास जाणीवपूर्वक टाळटाळ करत असल्याचं म्हटलं आहे.
 
स्टीव्ह जॉब्सने कधीही कोणत्याही स्वरुपाची देणगी दिली नाही त्याच्या ठायी दातृत्व कधीच नव्हतं. पण ही जॉब्सची संपत्ती असल्याने त्याबाबतीत काय करायचं याचा सर्वाधिकार त्याच्याकडे असणं स्वाभाविक आहे. पण एक छोटीशी बाब जी जॉब्सच्या स्वाभावातले कंगोरे स्पष्ट करु शकते. जॉब्स ऍपलच्या पार्किंग लॉटमध्ये कधीही गाडी व्यवस्थित पार्क करत नसे आणि अपंगांसाठी राखीव ठिकाणी तो गाडी लावत असे. अनेकदा दोन गाड्यांची जागा व्यापेल असा पध्दतीने तो आपली गाडी लावत असे. कर्मचारी वर्ग गाडी व्यवस्थित पार्क करण्याच्या सूचना देणारे स्टिकर त्यावर लावत असत. पण त्याने जॉब्सच्या सवयीत कधी सुधारणा झाल्याचे दिसून आलं नाही.
 
जॉब्स हा एक चांगला माणूस नव्हता हे वरील अनेक उदाहरणातून स्पष्ट होतं. पण तो एक प्रतिभासंपन्न आणि सृजनशील व्यक्ती होता, केवळ याच बाजूकडे आपण लक्ष द्यायचं का याचा विचार आपण करायला हवा.
 

First Published: Saturday, October 22, 2011, 15:51


comments powered by Disqus